Loksabha2019 : भाजपचा जाहीरनामा देशभक्तीने प्रेरीत : संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

- अब होगा न्याय या काँग्रेसच्या जाहिरनाम्याला उत्तर म्हणजे भाजपचा जाहीरनामा
- हा देशभक्तीनं प्रेरीत असलेला जाहीरनामा
- राम मंदिर, काश्मीरसाठीचं घटनेतील 370 वं कलम,समान नागरी कायदा यांचा समावेश
- हा जाहीरनामा म्हणजे देशविरोधी भूमिका घेणार्यांना उत्तर

नाशिक : काँग्रेस पक्षाच्या 'अब होगा न्याय' या जाहिरनाम्याला उत्तर म्हणजे भाजपचा जाहिरनामा आहे. हा जाहीरनामा देशभक्तीने प्रेरीत असून, राम मंदिर, जम्मू-काश्मिरसाठीचे कलम 370, समान नागरी कायदा, यासोबतच देशविरोधी भूमिका घेणाऱ्यांना उत्तर आणि हजारो शहिदांना मानवंदना देणार आहे. मोदी सरकारने मागील पाच वर्षात विकासाचा पाया रचला असून पुढील पाच वर्षात कळस चढविणार असल्याचे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.  

लोकसभा निवडणूकीतील भाजप-शिवसेना महायूतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी चे उमेदवार डॉ. भारती पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राऊत नाशिक मध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नाशिक मध्ये भव्य रॅली आली होती. यावेळी संजय राऊत यांच्यासोबत पालकमंत्री गिरीश महाजन, नाशिकच्या महापौर रंजना भानसी आदी उपस्थित होते.

संजय राऊत म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न कधीही संपत नाही. यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याची गरज असते. कारण सरकार केवळ एखाद्या पक्षाचे नसते. निवडणूकीच्या तोंडावर पक्ष, नेते प्रचारात व्यस्त असले तरी सरकारी यंत्रणांची काम सुरुच असतात. अशावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाची जबाबदारी यंत्रणांवर असते. असे असले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकारण आणू नये. सत्तेत असलो तरी सरकारला जागं करण्यासाठी आम्ही बोलत राहणार. नोट बंदीवर आदित्य ठाकरे यांनी मांडलेली भूमिका योग्य. शिवसेनेचीही तीचं भूमिका  आहे. असेही राऊत म्हणाले. परंतु, यावेळी राज ठाकरेंबाबतच्या व्हायरल पोस्टबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला. निवडणूक लढविण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, युतीधर्म पाळण्यासाठी भाजपचे माणिकराव कोकाटे अर्ज मागे घेतील अशी खात्री आहे.

गिरीश महाजन म्हणाले,  राम मंदिर हा आमच्या अस्मितेचा प्रश्न त्यामुळं त्याचा समावेश जाहीरनाम्यात केला आहे. शेतकरी, भूमिहीन, कामगार, नागरिकांचं आरोग्य यासाठी हा जाहीरनामा आहे. 2022 पर्यंत नागरिकांचे उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे, राम मंदिर हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात आला आहे. जम्मू काश्मिर मधील दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी 370 वं कलम रद्द करण्याची आमची मागणी असल्याचे महाजन म्हणाले. त्याबरोबरच उत्तर महाराष्ट्रातील सर्व 8 जागांवर युती विजयी होणार  आहे. बंडखोरांची समजूत काढण्यात आली आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रस्तावित भाजप प्रवेशाबद्दल मला माहिती नाही  हा अधिकार माझा नाही . मात्र, विखे पाटील भाजपमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच  असेल. असेही महाजन म्हणाले.

Web Title: BJP manifesto is pure out of patriotism says Sanjay Raut