Loksabha 2019 : बंडखोरीने वाढवली चुरस

बळवंत बोरसे
शनिवार, 20 एप्रिल 2019

मतदारसंघातील प्रमुख प्रश्‍न

  • आदिवासींचे होणारे स्थलांतर
  • रखडलेली औद्योगिक वसाहत
  • कुपोषण रोखण्यासाठी उपायांचा अभाव
  • दुर्गम भागात कनेक्‍टिव्हिटी नसणे

नंदुरबार मतदारसंघातील लढत काँग्रेसचे ॲड. के. सी. पाडवी आणि भाजपच्या डॉ. हीना गावित यांच्यात असली तरी तिला अंतर्गत अनेक पदर आणि नाराजीची झालर आहे. त्यातच भाजपचे निष्ठावंत, संघ परिवाराचे विश्‍वासू डॉ. सुहास नटावदकर यांनी अपक्ष म्हणून उडी घेतल्याने भाजप आणि काँग्रेसमधील एकसंधतेची कसोटी पाहणारी, चुरस आणि विजयाची समीकरणे गुंतागुंतीची करणारी ही निवडणूक असेल.

भाजपने नंदुरबार मतदारसंघात डॉ. हीना गावित यांची उमेदवारी कायम करीत नरेंद्र मोदी सरकारची कामगिरी मांडत काँग्रेससमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसनेही एकमताने उमेदवारी निश्‍चित करीत ॲड. के. सी. पाडवी यांना रिंगणात उतरवले आहे. डॉ. गावित यांच्या उमेदवारीविषयी सुरवातीला असलेले संभ्रमाचे वातावरण एकीकडे, तर काँग्रेसने तीन महिन्यांपासूनच सुरू केलेली तयारी दुसरीकडे, अशा स्थितीत आता भाजपचे बंडखोर डॉ. सुहास नटावदकरांच्या एंट्रीमुळे निवडणुकीत रंग भरला आहे. डॉ. नटावदकरांच्या रिंगणात उतरण्याने भाजपला मतविभागणीचा मुद्दा सतावणार आहे. मोदींचा करिष्मा आणि कोणतीही लाट नसताना २००९ मधील निवडणुकीत त्यांना एक लाखांवर मते मिळाली होती. त्यांना मानणारा वर्ग मतदारसंघात बऱ्यापैकी आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीने भाजपच्या मतांवर निश्‍चित परिणाम होईल, असे सांगितले जाते.

दुसरीकडे भाजपने गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात केलेली विकासकामे जसे की, आदिवासी महिलांना गॅसचे वाटप, इंटरनॅनशनल स्कूल, ग्रामीण भागात रस्ते, आदिवासी पाड्यात वीज, अशी ठोस कामे सांगत पुन्हा एकदा मोदींना संधीसाठी भाजपच्या विजयाचे साकडे घातले जात आहे.

काँग्रेसने पारंपरिक मतदाराला आवाहन करीत काँग्रेसचा बालेकिल्ला अभेद्य राखण्यासाठी पाठीशी राहण्याचे आवाहन केले जात आहे. मोदी सरकारची शेतकऱ्यांविषयीची धोरणे आणि त्यांचा बसलेला फटका, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी, सिंचनाच्या प्रश्‍नाकडे केलेले दुर्लक्ष आणि औद्योगिक वसाहतीचा रखडलेला प्रश्‍न इत्यादी बाबींकडे मतदारांचे लक्ष वेधले आहे. काँग्रेसने तालुकानिहाय थेट भेटीगाठींवर भर दिला आहे. भाजपनेही प्रचारफेऱ्या, बैठकांवर भर देत संवाद साधणे सुरू ठेवले आहे. सिंचनासह पाणीप्रश्‍न, रोजगाराचा अभाव, आदिवासींचे स्थलांतर अशा स्थानिक मुद्द्यावर सुरू असलेला प्रचार आणि आदिवासी जनता, युवकांमधील खदखद यामुळे निवडणूक अटीतटीची होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Nandurbar Constituency Rebel Politics