Loksabha 2019 : मोदींच्या सभेत पाण्याच्या बाटल्या नेण्यास मज्जाव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

अर्धनग्न आंदोलकालाही नोटीस
शेतकऱ्यांना दिलेले आश्‍वासन केंद्राने न पाळल्याच्या निषेधार्थ नगरसूल (ता. येवला) येथील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी मार्चमध्ये स्वत:चे कपडे स्पीड पोस्टाने मोदी यांना पाठविले होते. तसेच, केंद्र व राज्यातील भाजप सरकार हटत नाही, तोपर्यंत अर्धनग्न राहण्याचे अनोखे आंदोलन सुरू केले आहे. त्यापार्श्‍वभूमीवर येवला पोलिसांनी त्यांना नोटीस बजावून या या सभेत अनुचित प्रकार घडल्यास त्यास जबाबदार धरले जाईल, असे म्हटले आहे.

नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी (ता. २२) निफाड तालुक्‍यातील पिंपळगाव बसवंत येथील जोपूळ रस्त्यावर जाहीर सभा होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षात्मक उपाययोजना व सभेमध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. सभेमध्ये निषेधाच्या शक्‍यता गृहीत धरून काळे कपडे परिधान करणाऱ्यांसह सभास्थळी येणाऱ्यांना हॅंडबॅग आणि पाण्याच्या बाटल्यादेखील आणण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हात सभा ऐकणाऱ्यांना किमान तीन ते चार तास पिण्याच्या पाण्याविना राहण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. परिणामी सभेत येणाऱ्यांना चक्कर येण्याची शक्‍यता आहे.

तीन हजार पोलिसांचे सभेभोवती कडे
पिंपळगाव बसवंतच्या सभेसाठी नाशिक ग्रामीणच्या फौजफाट्यासह नाशिक शहर पोलिस आयुक्तालय, धुळे, नगर, जळगाव यासह परजिल्ह्यातील सुमारे तीन-साडेतीन हजार पोलिसांचा फौजफाटा सभास्थळी, मार्गावर तैनात करण्यात आलेला आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोर्जे यांच्यासह चार जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक, राज्य गुप्तवार्ता विभागाचे अधीक्षक आणि राज्य राखीव पोलिस दलाचे प्रमुख बंदोबस्ताच्या नियोजनावर करडी नजर ठेवून आहेत. पंतप्रधानांच्या सभेवेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस यंत्रणेने कडक सुरक्षाव्यवस्था केली आहे. सभास्थळी नागरिकांना एकत्रित न बसविता ब्लॉक नियोजन केले आहे. जोपूळ रोडवरील बाजार समितीलगतच्या ६८० एकर पडीक जागेवर सुमारे तीन हजार पोलिस कर्मचारी तैनात आहेत. सभामंडपासमोरील टेकडीजवळ २५ हजार गाड्यांच्या पार्किंगची सोय आहे. पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेल्या ठिकाणावरून सभास्थळी जाण्यासाठी एक किलोमीटरची पायपीट करावी लागणार आहे. 

रणरणत्या उन्हात पाण्यालाच मज्जाव
उन्हाळ्याचे दिवस असून, पारा ४० अंश सेल्सिअसवर पोचला आहे. सकाळी साडेआठ-नऊलाच उन्हाचे चटके जाणवत असताना, सभास्थळी पोचण्यासाठी नागरिकांना तब्बल एक ते दीड किलोमीटर अंतराची पायपीटही करावी लागणार आहे. त्यात, पोलिसांनी पिण्याच्या पाण्याच्या बाटलीलाही मज्जाव केला आहे. त्यामुळे ऐन रणरणत्या उन्हामध्ये नागरिकांना पाण्याविना तीन-चार तास सभास्थळी थांबावे लागणार आहे. त्यामुळे उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या उद्‌भवण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

आंदोलनाच्या भीतीने शेकडोंना नोटिसा
शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात आलेल्या अपयशामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात रोष आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कांद्याची बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत या परिसरात होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून गनिमीकाव्याचा वापर करीत आंदोलनाची शक्‍यता असल्याने त्याची धास्ती पोलिसांनी घेतली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्यातील शेकडो आंदोलक शेतकऱ्यांना प्रतिबंधात्मक १४९ कलमान्वये नोटिसा बजाविल्या आहेत.
 
पेन्शर्न्सवर बारीक लक्ष
आंदोलक शेतकरी व पेन्शर्न्स संघटनेकडून आंदोलन केले जाण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यापार्श्‍वभूमीवर सतर्क झालेल्या पोलिसांनी पेन्शर्न्स संघटनेला निदर्शन करण्यास परवानगी नाकारली आहे, तर शेतकरी आंदोलकांकडून गनिमीकाव्याने आंदोलन करण्याची दाट शक्‍यता आहे. जिल्हा पोलिसांकडून जिल्ह्यातील शेकडो आंदोलक शेतकरी, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसंदर्भात वारंवार रस्त्यावर होणारे आंदोलन, शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Narendra Modi Speech Water Bottle Ban Politics