Loksabha 2019 : राष्ट्रवादी अन्‌ शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई

विक्रांत मते
शनिवार, 20 एप्रिल 2019

मतदारसंघातील प्रलंबित प्रश्‍न

  • रखडलेले औद्योगीकरण
  • निरंतर विमानसेवेचे स्वप्न अपुरे
  • प्रक्रिया उद्योगांचा अभाव
  • हक्काच्या पाण्यावर डल्ला
  • रेल्वेसेवेचा विस्तार

नाशिक मतदारसंघात महायुतीसमोर अपक्ष उमेदवाराने, तर महाआघाडीसमोर वंचित बहुजन आघाडीने आव्हान निर्माण केल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही लढत अस्तित्वाची बनली आहे. अशीच अवस्था झालेली शिवसेना उत्तर महाराष्ट्रातील एकमेव जागा कशी टिकवणार, हा खरा प्रश्‍न आहे.

लोकसभेची निवडणूक जाहीर होताच, भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे निवडून येतीलच, असे छातीठोक सांगितले जात होते. मात्र प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात छुप्या राजकारणातील अनेक पैलूंनी ‘काम’ दाखवायला सुरवात केल्याने नाशिकची निवडणूक महायुतीला वाटते तेवढी सोपी राहिलेली नाही. शिवसेनेसाठी निवडणूक महत्त्वाची असली, तरी प्रचारातून शिवसेना गायब झाल्याचे दिसते. नेत्यांच्या सभांना व्यासपीठावर गर्दी होते, परंतु प्रत्यक्षात खर्च करायचा कुणी, असा प्रश्‍न शिवसैनिकांना पडलाय. नाशिकची निवडणूक भाजपने हाती घेतल्याचे दिसते. आमदारांना विधानसभा निवडणूक लढवायची असल्याने मतदारसंघाकडे लक्ष केंद्रित केले आहे. भाजपचे नगरसेवक शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करताहेत.  

भाजपमध्येही शिवसेनेसारखी स्थिती होती. पण पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या ‘मंत्रा’ने भाजपची यंत्रणा कामाला लागली. हाच ‘मंत्र’ शिवसेनेला हवा आहे. मात्र नेमके इथेच गणित बिघडलेले दिसते.

पालकमंत्र्यांची राजकीय ताकद वाढल्यास पुढे काही खरे नाही? ही भीती भाजपच्या सत्तेतील पदाधिकाऱ्यांना असल्याने निवडणुकीत हाही पैलू महत्त्वाचा ठरतोय. प्रचाराच्या पातळीवर महायुतीत अशी स्थिती असताना आणखी मोठे आव्हान अपक्ष उमेदवार ॲड. माणिकराव कोकाटे यांनी उभे केले आहे. शिवसेनेच्या सिन्नर आणि देवळालीच्या बालेकिल्ल्यातच त्यांनी मांड ठोकल्याने महायुतीसमोरची आव्हाने वाढलीत. काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या उमेदवारापेक्षा कोकाटे यांच्यावर महायुतीचे लक्ष केंद्रित झाले आहे. कोकाटे यांना गृहीत धरत नसल्याचे युतीचे नेते सांगत असले, तरी कोकाटेंची मदार ज्या सिन्नर तालुक्‍यावर आहे, तेथेच अधिक सभा का घेतल्या जात आहेत? याचे उत्तर मात्र महायुतीकडे नाही. 

राष्ट्रवादी-काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळांनी अद्याप पत्ते खुले केलेले नाहीत. प्रचार आणि मतदान यंत्रणेचे पत्ते खुले केल्यास महायुतीकडून त्याला शह बसण्याच्या शक्‍यतेने काळजी घेतली जात आहे.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासाठी पुतण्या समीर यांना निवडून आणणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे राज्यातील प्रचाराची धुरा सांभाळताना नाशिकमध्येही घरोघरी जाऊन भुजबळ भेटी घेत आहेत. ग्रामीण भागात समीर, तर शहरी भागात स्वतः भुजबळ प्रचारात आहेत. गेल्या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात ‘जात’ फॅक्‍टर महत्त्वाचा ठरला होता. मात्र यंदा तशी स्थिती दिसत नाही. 

शेवटच्या टप्प्यात हा मुद्दा प्रकर्षाने पुढे येऊ शकतो, अशी शक्‍यता महाआघाडीत व्यक्त होत आहे. अपक्ष उमेदवार महायुतीसाठी तर महाआघाडीसाठी बहुजन वंचित आघाडी डोकेदुःखी ठरण्याची चिन्हे दिसताहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Nashik Constituency NCP Shivsena Politics