Loksabha 2019 : माकपच्या आव्हानाने चुरस वाढली

Dindori-Constituency
Dindori-Constituency

आदिवासींसाठी राखीव दिंडोरी (जि. नाशिक) मतदारसंघात शिवसेनेतून आलेल्या धनराज महालेंना राष्ट्रवादीने, तर राष्ट्रवादीतून आलेल्या डॉ. भारती पवारांना भाजपने उमेदवारी दिली आहे. उमेदवारांच्या अदल-बदलाने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ आहे. अशाही स्थितीत आपापल्या शक्तिस्थळांच्या जोरावर चुरस वाढविण्यासाठी धडपडणाऱ्या या दोन उमेदवारांसमोर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार आमदार जीवा पांडू गावितांच्या उमेदवारीने कडवे आव्हान उभे केलेय.

खासदारकीची हॅट्ट्रिक करणारे हरिश्‍चंद्र चव्हाण यांची उमेदवारी कापत डॉ. पवारांचे पक्षांतर आणि त्यांच्या उमेदवारीत योगदान देणारे चांदवड-देवळ्याचे भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर, निफाडचे शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांनी महायुतीच्या नेत्यांच्या मेळाव्याद्वारे कार्यकर्त्यांमध्ये जोष भरण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, मतदारसंघातल्या ९० टक्के शेतीशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष निगडित कुटुंबांच्या खदखदीला हात घालत राष्ट्रवादीने महालेंसाठी मैदान ठोकण्यास सुरवात केली आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत लाखांहून अधिक मते खेचणाऱ्या गावितांना मतदार कसा प्रतिसाद देतील, यावर विजयाची गणिते अवलंबून आहेत. गावीत स्वतः कळवण-सुरगाणामधून विधानसभेत प्रतिनिधित्व करताहेत. राजकीयदृष्ट्या पाहिल्यास छगन भुजबळ येवल्याचे, तर त्यांचा मुलगा पंकज नांदगावचे, त्यांच्याच पक्षाचे नरहरी झिरवळ दिंडोरीचे आमदार या महालेंच्या जमेच्या बाजू आहेत. तरीही नांदगावमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी, तर येवल्यातील राष्ट्रवादीच्या गोटातील खदखद थांबण्याचे नाव घेत नाही. दिंडोरीचे माजी आमदार रामदास चारोस्करांनी भाजपच्या पारड्यात वजन टाकलं आहे.

कळवण म्हणजे (कै.) ए. टी. पवार असे समीकरण. माजी मंत्री ‘एटीं’च्या धाकट्या स्नुषा डॉ. भारती भाजपच्या उमेदवार तर, त्यांच्या थोरल्या जाऊबाई, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री आणि थोरले दीर जिल्हा परिषद सदस्य नितीन यांनी महालेंसाठी कळवण-सुरगाण्यात तळ ठोकलायं.

महायुतीतील नेत्यांचे मनोमिलन झालंय, मात्र ‘ग्राउंड रिॲलिटी’ चक्रावणारी आहे. प्रचारात शिवसैनिक खरंच मनाने महायुतीसोबत आहेत का? याचे कोडे उलगडत नाही. यापूर्वी राष्ट्रवादीने पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे उत्तमबाबा भालेरावांना शिवसेनेच्या भरवश्‍यावर आमदार म्हणून निवडून आणलंय.

त्यांना आता काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवालांची साथ आहे. त्यातच नाराजीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत चव्हाणांनी भेट घेतली असली, तरीही त्यांच्या समर्थकांसह विशेषतः बहुजन समाजातील अन्‌ त्यांचा शद्ब मानणारे तेही शेतीशी जोडले गेलेले मतदार चव्हाणांचे कितपत ऐकतील? हाही प्रश्‍न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com