उत्तर महाराष्ट्र - भाजपचा विजयी षटकार; महाजन किंग मेकर

राहुल रनाळकर
शुक्रवार, 24 मे 2019

काही महिन्यांपासून उत्तर महाराष्ट्रात काही धक्कादायक निकाल लागू शकतात, अशी चर्चा होती. तथापि प्रत्यक्ष निकालात भाजपने उत्तर महाराष्ट्रात ‘क्‍लीन स्विप’ मारलेला दिसून आला. सुप्त मोदी लाट या वेळी २०१४ पेक्षाही अधिक प्रभावी ठरली.

काही महिन्यांपासून उत्तर महाराष्ट्रात काही धक्कादायक निकाल लागू शकतात, अशी चर्चा होती. तथापि प्रत्यक्ष निकालात भाजपने उत्तर महाराष्ट्रात ‘क्‍लीन स्विप’ मारलेला दिसून आला. सुप्त मोदी लाट या वेळी २०१४ पेक्षाही अधिक प्रभावी ठरली. 

रावेर मतदारसंघातून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा ३ लाख ३१ हजारांवर मताधिक्‍याने अपेक्षेप्रमाणे विजयी झाल्या. यामुळे खडसेंच्या नेतृत्वावर विश्वास वाढल्याचेच दिसून येते. तळागाळापर्यंत कामांच्या माध्यमातून पोचलेल्या रक्षा यांना मिळालेली ही मोठी पावती आहे. माजी खासदार आणि काँग्रेसचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांना ३ लाख १८ हजार २९, तर वंचित बहुजन आघाडीचे नितीन कांडेलकर यांनी ८७ हजार ७९९ मते मिळवली. ही मते निश्‍चितच दखल घेण्यासारखी आहेत. 

जळगाव मतदारसंघात चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील ३ लाख ८७ हजार एवढ्या प्रचंड फरकाने विजयी झाले. निवडणुकीच्या तोंडावर भाजपने उन्मेष यांना तिकीट दिले. पक्षांतर्गत सुंदोपसुंदीवर मात करून भाजपने मोठा विजय संपादला. जळगाव भाजपचा बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर तो जमीनदोस्त करतील, अशी शक्‍यता होती. गिरीश महाजन यांची अचूक खेळी आणि आत्मविश्वासाच्या बळावर भाजपने जळगाव राखले.

विशेष म्हणजे विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांचे तिकीट कापून सुरवातीला स्मिता वाघ आणि त्यानंतर ही उमेदवारी कापून उन्मेष यांना महाजनांनी मैदानात उतरवले होते. 

धुळे मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरेही मोठ्या फरकाने विजय झाले. काँग्रेसचे कुणाल पाटील त्यांना तगडे आव्हान देतील, अशी शक्‍यता होती. तथापि, ती फोल ठरवत डॉ. भामरे विजयी झाले. काँग्रेससह अनिल गोटे फॅक्‍टर मोदी लाटेसमोर निष्प्रभ ठरला. मालेगाव शहर वगळता डॉ. भामरेंची आघाडी अभूतपूर्व आहे. धुळ्यातील जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवण्याचे आव्हान डॉ. भामरेंसमोर असेल.

नंदुरबारची भाजपची जागा अडचणीत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. ॲड. के. सी. पाडवींच्या रूपाने काँग्रेसने सर्वांना चालणारा चेहरा भाजपच्या खासदार डॉ. हीना गावित यांच्यासमोर दिला होता. विद्युतीकरणाच्या कामात हीना गावित यांनी उत्तम काम आदिवासी पट्ट्यात केले आहे. त्याने त्यांना साथ दिल्याचे निकालानिमित्ताने दिसून आले. धुळे, नंदुरबारमध्ये महाजन आणि जयकुमार रावल यांची गणितंही अचूक ठरली. 

नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत गोडसेंच्या गळ्यात पुन्हा खासदारकीची माळ पडली आहे. दिंडोरीतून डॉ. भारती पवार यांच्या रूपाने कमळाने ‘हॅट्ट्रिक’ मारली. नाशिककर दोनदा खासदार निवडून देत नाहीत, ही परंपरा नाशिककरांनी खंडित केली. तीनदा खासदार राहिलेल्या हरिश्‍चंद्र चव्हाणांची उमेदवारी कापून भारती पवारांना दिलेल्या उमेदवारीचा निर्णयही योग्य ठरल्याचे दिसून आले. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी दमदार होण्याचे संकेत निकालातून मिळाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election Results BJP Win Girish Mahajan Politics