Loksabha 2019 : आदिवासींचे हक्क अबाधित - नरेंद्र मोदी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 April 2019

लोकसभा निवडणुकीतील नाशिकचे शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीतील भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार तसेच नंदुरबार व धुळे मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. हीना गावित व डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी झालेेल्या सभेत पंतप्रधान बोलत होते. 

पिंपळगाव बसवंत / नंदुरबार - तुमच्या इच्छेशिवाय कुणी काहीही करू शकणार नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथले पाणी कुठेही जाणार नाही, अशी ग्वाही आज येथे दिली. तसेच आदिवासींचे हक्क अबाधित राहतील, कांद्याची निर्यातवृद्धी करत एचएएलच्या अनुषंगाने संरक्षण उत्पादनात दहा वर्षांत दुप्पट वाढ होईल, असेही त्यांनी आश्‍वस्त केले. 

लोकसभा निवडणुकीतील नाशिकचे शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीतील भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार तसेच नंदुरबार व धुळे मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. हीना गावित व डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी झालेेल्या सभेत पंतप्रधान बोलत होते. 

पंतप्रधानांनी नाशिककरांना माझा नमस्कार, अशी मराठीतून संवादाला सुरवात करत संस्कृतीच्या सप्तरंगात नटलेल्या तीर्थक्षेत्री भूमीत येऊन धन्य झाल्याचे सांगताच, टाळ्यांचा कडकडाट झाला. नाशिकच्या पाण्यावरून काँग्रेस राजकारण करत आले आहे आणि एचएएल बाबतीतसुद्धा असे घडत असल्याची टीका करून पंतप्रधानांनी नाशिकचे ड्रायपोर्ट होईल, असे अधोरेखित केले. ते  म्हणाले, की शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत. शेतकरी सन्मान योजनेची व्याप्ती वाढवत पाच एकराची अट रद्द केली जाईल. कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून कांद्याची साठवणूक, वाहतूक खर्च कमी करणे यासाठी प्रयत्न केले जातील. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...
शरद पवार यांची सद्‌सद्विवेक बुद्धी शाबूत राहिलेली नाही
भ्रष्टाचार केल्याने तुम्ही तुरुंगात गेला (छगन भुजबळांचा नामोल्लेख टाळून) असून जिल्ह्यातील ‘बहुरूपी’ आहात
नार-पार नदीजोड प्रकल्पातून पाणी परत आणत १७ धरणांतून जिल्ह्याला दिले जाईल
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावणेतीन हजार कोटींचा लाभ मिळाला, मुद्रातून चार लाख लोकांना कर्ज दिले

रामदास आठवलेंचा काव्यमय संवाद
नरेंद्र मोदी विकासपुरुष है, राहुल गांधी बकासुर है
मोदी फकीर है, राहुल गांधी अमिरों की लकीर है
भ्रष्टाचाराची आमच्याकडे आहे जंत्री म्हणून नरेंद्र मोदी बनतील प्रधानमंत्री
आम्ही तयार आहेत भजी तळायला, तुम्ही आहात का पीठ मळायला? 

मी बोलतो अन्‌ विरोधकांना धक्का बसतो - मोदी
देशाची सुरक्षा, वंशवाद, भ्रष्टाचार यावर बोलत असताना देशाच्या विकासाची चर्चा करतो. पण देशाची सुरक्षा, वंशवाद, भ्रष्टाचारावर मी बोललो की, विरोधकांना धक्का बसतो, असे टीकास्त्र काँग्रेस-राष्ट्रवादीवर सोडत पंतप्रधान म्हणाले, की दोन टप्प्यांतील मतदानातून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. मुळातच, २०१४ पूर्वी देशात बाँबस्फोट व्हायचे आणि पाकिस्तानच्या नावाने रडण्यापलीकडे काही होत नव्हते. आता तुमच्या चौकीदारने विरोधकांची कुचकामी नीती बदलून शत्रूंना घुसून मारण्याचे धोरण स्वीकारले, म्हणून शत्रू आपल्या देशाकडे वक्रदृष्टी करण्याअगोदर शंभरवेळा विचार करतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi was in the meeting convened for the campaign of candidates from Nandurbar and Dhule constituencies