Loksabha 2019 : 'मांजरपाडा तो झाकी है, नार पार अभी बाकी है..!' : मुख्यमंत्री फडणवीस 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

नारपार प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दहा हजार 800 कोटी रुपये मिळणार आहे. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

लोकसभा 2019
येवला : मांजरपाडयाला पाणीदार मंत्री गिरीश महाजन यांनी 350 कोटीचा निधी दिल्याने बोगदा पूर्ण झाला असून पहिला पाऊस पडताच या बोगद्यात पाणी आलेले असेल. मांजरपाडा तो झाकी है, नार पार अभी बाकी है..असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलशक्ति मंत्रालय तयार केले असून त्यातून नदी जोड प्रकल्पासह सिंचनाच्या प्रकल्पांना चालना दिली जाणार आहे. या अंतर्गत नारपार प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दहा हजार 800 कोटी रुपये मिळणार आहे. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना महायुतीच्या प्रचारार्थ येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या पटांगणात आज झालेल्या सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार नरेंद्र दराडे,आमदार किशोर दराडे, सीमा हिरे, उमेदवार भारती पवार, माजी आमदार मारोतराव पवार, संजय पवार, माजी सभापती संभाजी पवार, उपसभापती रूपचंद भागवत, नगरसेवक प्रमोद सस्कर, म्हाडाचे अध्यक्ष शिवाजी ढवळे, जिल्हाप्रमुख सुहास कांदे आदी उपस्थित होते.

तालुका टँकरमुक्त करण्यासाठी प्रस्तावित असलेली 41 गाव पाणीपुरवठा योजना, मांजरपाडा प्रकल्प, पुणेगाव-डोंगरगाव प्रकल्प, विणकरांच्या समस्या सोडवाव्यात, शेतकरी आंदोलनातील पिंपळगाव येथील शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्या आमदार किशोर दराडे यांनी केल्या. मागील सात महिन्यातच मुख्यमंत्र्यांकडे जेव्हा येवल्यासाठी निधी मागितला तेव्हा त्यांनी निधी दिल्याने आतापर्यंत 12 कोटी रुपयांची कामे मंजूर झाल्याचे दराडेंनी सांगितले. तालुका वर्षानुवर्ष दुष्काळाच्या झळा सहन करत असल्याने करंजवण, मांजरपाडा प्रकल्प व पुणेगाव डोंगरगाव कालव्याचे काम पूर्ण करून तालुक्याची टंचाईतून मुक्तता करावी, अशी मागणी यावेळी बोलताना माजी सभापती संभाजी पवार यांनी केली. भाजपचे नगरसेवक प्रमोद सस्कर, प्रदेश सदस्य बाबा डामाळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

फडणवीस म्हणाले की, येथे प्रत्येक सभेचा एकच विषय असतो तो म्हणजे पाणी. पण पंधरा वर्ष भुजबळांनी फक्त आश्वासने दिली मग पाणी कोणाला दिले, असा सवाल करून यापुढील काळात नारपार प्रकल्प हाती घेणार असून गुजरातला आघाडीच्या सरकारने दिलेले पाणी महाजन यांनी परत आणले आहे. भुजबळ मोदींच्या नकला करतात पण देश घडविण्याची आणि सुरक्षेची ताकद मोदी मध्येच आहेत, नकला करून काहीही साध्य होत नाहीत, असा चिमटा फडणवीस यांनी घेतला.

बंडूने खंडूला मारले.. अन् सगळे हसले -
फडणवीस सभांमधून भारत-पाकिस्तान वादाचा मुद्दा पटवून देण्यासाठी सक्षम नेतृत्व लागते हे सांगत आहेत. त्यासाठी हे भांडण गल्लीतल्या बंडूने खंडूला मारले आणि खंडूने दादाला सांगितले असे नसल्याचे उदाहरण दिले. हे उदाहरण फडणवीसांनी सर्वत्र दिले असले तरी येथे मात्र या उदाहरणाने एकच हशा पिकला. कारण मुख्यमंत्र्यांच्या या सभेच्या व्यासपीठावर येथील नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर बसलेले होते आणि काही मिनिटांपूर्वी येवल्याच्या विकासाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलताना त्यांचा उल्लेख बंडूजी असा केला होता. त्यानंतरच्या काही मिनिटातच मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा बंडू-खंडूचे उदाहरण पुढे आल्याने एकच हशा पिकला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rs ten thousand crore will be received for completion of the Narpar project says Devendra Fadnavis