Loksabha 2019 : युती, आघाडीचा धर्म गट-तट पाळतील का? 

Loksabha 2019 : युती, आघाडीचा धर्म गट-तट पाळतील का? 

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी आणि नंतरही रुसवेफुगवे, मतभेद, गटबाजी संपुष्टात आल्याचे चित्र सत्ताधारी भाजप व शिवसेना युती, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांकडून पुढे आणले जात आहे. मात्र, या प्रमुख पक्षांमधील गट-तट युती, आघाडीचा धर्म पाळतील का, हा खरा प्रश्‍न आहे. त्यांच्यात कितपत एकोपा राहील, यावर विजयाचे गणित अवलंबून असेल. 

भाजपतर्फे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि काँग्रेसतर्फे माजी मंत्री रोहिदास पाटील, डॉ. तुषार शेवाळे यांनी लोकसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी दीड ते दोन महिने आधीच प्रचाराला सुरवात केली. अशात राज्यातील एकूणच संबंध पाहता फारकतीची शक्‍यता असलेल्या सत्ताधारी भाजप- शिवसेनेत युती, तर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाली. त्यामुळे संभाव्य उमेदवारांना हायसे वाटले. ही संधी साधत त्यांनी आपापल्या पक्षांतील गटबाजी, मतभेद, रुसवे-फुगवे संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नांना वेग दिला. 

धुळे महापालिकेची डिसेंबर २०१८ मध्ये निवडणूक झाली. तिथून राजकीय समीकरणे बिघडली. महापालिका निवडणुकीच्या नेतृत्वावरून शहरातील भाजपचे आमदार अनिल गोटे आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यात उभी फूट पडली. भाजपला ७४ पैकी ५० जागा मिळाल्यानंतर हा निकाल केवळ आमदार गोटेच नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या नेते, पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागला. त्यांनी ‘ईव्हीएम’ घोटाळ्याचा मुद्या ऐरणीवर आणत मंत्री महाजन, भामरे, रावल यांच्यासह भाजपला लक्ष्य केले. त्यात मंत्री भामरे यांचा उधळणारा वारू लोकसभा निवडणुकीत रोखण्यासाठी पराभूतांमध्ये युती झाल्याचे चित्र समोर आले. 

भामरेंविरोधात विरोधकांची एकी
कधी मनोमीलन होईल अशी सुतराम शक्‍यता नसतानाही एकमेकांचे हाडवैरी आमदार गोटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे मात्र एकत्र आल्याचा राजकीय भूकंप झाला. ‘ईव्हीएम’ घोटाळ्याच्या मुद्यावरून कायदेशीर लढाईची घोषणा आमदार गोटे यांनी केली आणि या संदर्भात त्यांनी बोलाविलेल्या बैठकीत त्यांचे कट्टर विरोधक शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यात आमदार गोटे यांनी, आता आमदारकीत स्वारस्य नाही; परंतु भामरे, रावल व महाजन यांचा येत्या निवडणुकीत पाडाव केल्याशिवाय राहणार नाही, असा चंग उद्धृत केला. मंत्री डॉ. भामरे यांच्या विरोधातली ही आयती संधी मानून आमदार गोटे यांच्याशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेनेतील एका गटाने घरोबा करण्याचा सुरू केलेला प्रयत्न लपून राहिलेला नाही. त्यातून भामरे यांच्याविरुद्ध युतीतील नाराज गटासह काँग्रेस आघाडी व मित्रपक्ष, असे सारे एकत्र आल्याचे दिसून आले.    

गटा- तटाच्या पावलांवर लक्ष
जिल्ह्याच्या राजकीय पटलावर मंत्री भामरे, रावल विरुद्ध आमदार गोटे, माजी मंत्री पाटील विरुद्ध आमदार पटेल, तसेच पदाधिकारी स्तरावर भाजप शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबन चौधरी विरुद्ध आमदार गोटे समर्थक गट; शिवसेनेचे माजी आमदार प्रा. शरद पाटील विरुद्ध जिल्हाप्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी, संजय गुजराथी विरुद्ध जुने पदाधिकारी; काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष युवराज करनकाळ, जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर विरुद्ध इतर काही ज्येष्ठ पदाधिकारी, तसेच माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार कुणाल पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष किरण पाटील, अशी काही उदाहरणे समोर येतात. अशी गटबाजी, गट- तट काहींचे राजकीय अस्तित्व टिकवून ठेवणारी मानली जाते.

एकोप्यावर विजयाचे गणित...
भाजप व शिवसेनेच्या कार्यक्रम पत्रिकांमध्ये एकमेकांच्या लोकप्रतिनिधींसह मंत्री भामरे व शिवसेनेचे पालकमंत्री दादा भुसे यांची नावे दिसू लागली आहेत. काँग्रेसमध्ये माजी मंत्री पाटील आणि आमदार अमरिशभाई पटेल एकत्र आले. विविध पक्षीय नेतेमंडळी, पदाधिकारी एकत्र आल्याचे दिसून येते; पण एकोप्यातून प्रचाराला मात्र फारशी गती आल्याचे चित्र अद्याप समोर आलेले नाही. उमेदवारी अर्जाची प्रक्रिया संपल्यावर प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात युती, आघाडीमधील एकोपा कसा राहील यावर उमेदवारांच्या विजयाचे गणित अवलंबून असल्याचे म्हटले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com