esakal | Election Results : बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीसह भुजबळांना जोरका झटका धीरेसे!
sakal

बोलून बातमी शोधा

Yeola Constituency Analysis for loksabha 2019 results
  • येवला मतदारसंघ विश्लेषण
  • शिवसेना-भाजपाने लावलेली फिल्डिंग आणि मुख्यमंत्रांची सभा कामाला
  • पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य देताना भुजबळ यांना दुसऱ्यांदा अपयश ​

Election Results : बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीसह भुजबळांना जोरका झटका धीरेसे!

sakal_logo
By
संतोष विंचू

लोकसभा 2019
येवला लासलगाव मतदार संघातील अगदी जोरदारपणे झालेल्या लढाईमुळे दोन्ही पक्षांकडून मताधिक्याचे दावे करताना पंधरा ते वीस हजाराचे आकडे पार होत नव्हते. आज निकालातून हेच चित्र राहिले पण भाजपा-शिवसेनेचा अंदाज खरा अन् राष्ट्रवादीचा दावा फोल ठरला. येथून 20 व्या फेरीअखेर भाजपाच्या पवारांना 25 हजार 751 मतांची आघाडी मिळाली तर हा आकडा 30 हजारांपर्यत जाणार आहे. एकूणच पवार यांच्या विजयात मतदार संघाने सिंहाचा वाटा उचललेला असून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात आगामी विधानसभेसाठी भुजबळांसह पक्षाला देखील 'जोरका झटका धीरेसे लगे' असे म्हणण्याची वेळ आली आहे.

नवमतदारापासून ते 35 वयोगटात यावेळीही मोदी फीवर कायम होता. त्यात शिवसेना-भाजपाने लावलेली फिल्डिंग आणि मुख्यमंत्रांची सभा कामाला आली अन् येथे मताधिक्याचे कमळ फुलले. विकासकामातून मतदारसंघावर वर्चस्व निर्माण करणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मागील तीनही विधानसभा निवडणुकीत एकतर्फी विजय मिळविला आहे. लोकसभेला मात्र पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य देताना भुजबळ यांना दुसऱ्यांदा अपयश आले आहे.

येथे शिवसेनेचे ग्रामीण भागात तर भाजपाचे शहरातच वर्चस्व आहे.या दोघांच्या एकत्रित प्रयत्नांतून मताधिक्य 30 हजारांपर्यत गेल्याचे दिसते. गेल्या विधानसभेनंतर भुजबळ अडचणीत सापडले तेव्हापासून येथील राष्ट्रवादीचे वर्चस्व घटत चालले आहे. त्यानंतर सर्वच निवडणुकांत सुरु झालेली शिवसेना-भाजपाची यशाची एक्स्प्रेस लोकसभेलाही कायम राहिल्याने भुजबळांना जोरदार टक्कर दिल्याचे आकडे सांगतात. भाजपात अंतर्गत वादावादीमुळे पालकमंत्र्यांनी शिवसेनेचे आमदार किशोर दराडे व संभाजी पवार यांच्यावरच मतदार संघाच्या प्रचाराची धुरा सोपवली होती, त्यांनी ती समर्थपणे पार पाडल्याचे दिसते. भाजपात गटबाजी व शिवसेनेत अंतर्गत कलह असला तरी तो पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी मतांमधून दिसू दिला नाही. 

भुजबळांच्या अनुपस्थित जेष्ठ नेते माणिकराव शिंदे, अंबादास बनकर यांनी जवाबदारी सांभाळली मात्र राष्ट्रवादीतील बंडाळी मात्र उघडपणे समोर आली व ती शमविण्याकडे भुजबळांचे दुर्लक्ष युतीच्या पथ्थ्यावर पडलेले दिसते. आता कारणे काहीही असो पण आगामी राजकारणाच्या दृष्टीने राष्ट्रवादीला मात्र येथून आत्मपरीक्षणाचा संदेश मतदारांनी दिला आहे हे नक्की!