Election Results : ...तर विदर्भात 10 पैकी 8 जागांवर महायुती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

विदर्भातील 10 पैकी 8 लोकसभा मतदारसंघात भाजप-सेना युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर अमरावती व चंद्रपूर मतदारसंघात मात्र, चुरशीची लढत बघायला मिळत आहे. 

लोकसभा निकाल 2019 :  एक्‍झिट पोलच्या अंदाजानुसार संपर्ण देशभरात भाजपप्रणित रालोआने आघाडी घेतली आहे. त्याला विदर्भ देखील अपवाद नाही. विदर्भातील 10 पैकी 8 लोकसभा मतदारसंघात भाजप-सेना युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर अमरावती व चंद्रपूर मतदारसंघात मात्र, चुरशीची लढत बघायला मिळत आहे. 

केंद्रीयमंत्री तसेच भाजपचे हेवीवेट नेते नितीन गडकरी यांची विजयी घोडदौड सुरू झाली आहे. पहिल्या फेरीपासूनच त्यांनी आघाडी घेतली होती. पाचव्या फेरीअखेर सुमारे 58 हजारांचे मताधिक्‍य त्यांच्याकडे आहे. निकालाच कौल बघता ते सुमारे दोन ते अडीच लाखांच्या मताधिक्‍यांनी निवडून येण्याची शक्‍यता आहे. पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांची विजयाकडे घोडदौड सुरू आहे.

आठव्या फेरीअखेर मेंढे यांना 2,24,224 मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार नाना पंचबुद्धे यांना 1,63,657 मते मिळाली आहेत. गडचिरोलीत 12 व्या फेरीअखेर भाजपचे अशोक नेते यांना 2,61754, कॉंग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांना 2,01,276 तर बहुजन वंचित आघाडीच्या रमेश गजबे यांना 67,004 मते आहेत. या मतदारसंघात भाजपच्या अशोक नेते यांनी 60,400 मतांची आघाडी घेतली आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत. तिसऱ्या फेरीअखेर शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी एकूण 79 हजार 348 मते मिळाली आहेत. प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी 69 हजार 999 मते मिळाली. 

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना पहिल्या फेरीपासून मिळालेली आघाडी आठव्या फेरीतही कायम आहे. त्यांनी 26620 मतांनी आघाडी घेतली असून त्या सर्वच विधानसभा क्षेत्रात कॉंग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्यापेक्षा पुढे चालत आहेत. वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा मतदार संघात पुन्हा भाजप-शिवसेना युतीला यश मिळताना दिसत आहे. तर या तीनही जागांवर अनुक्रमे वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार पिछाडीवर आहे.

नवव्या फेरीनंतर, अकोला लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय धोत्रे 1 लाख 48,178 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना 3 लाख 16 हजार 192 मते मिळाली. तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ऍड. प्रकाश आंबेडकर हे 1 लाख 68 हजार 14 मतांनी दुसऱ्या स्थानावर आहेत. तर 19 व्या फेरीनंतर, बुलडाणा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव हे 1 लाख 5 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राजेंद्र शिंगणे हे दुसऱ्या स्थानाव आहेत. 

वर्धा लोकसभा मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार रामदास तडस आघाडीवर आहेत. तडस यांना 1,15, 848 तर कॉंग्रेस उमेदवार चारुलता टोकस 81,654 तर वंचित बहुजन आघाडीचे धनराज वंजारी यांना 6,823 मते आहेत. 

चंद्रपूर, अमरावतीत काँग्रेस? 

चंद्रपूर मतदारसंघात प्रत्येक फेरीत चुरशीची लढत होताना दिसत आहे. भाजपचे हेविवेट नेते केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यावर पराभवाचे सावट आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचे सुरेश (बाळू) धानोरकर यांनी सहाव्या फेरीअखेर 5659 मतांची आघाडी घेतली आहे. अमरावती लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येत असून पहिल्या टप्प्यात आघाडीवर असलेले शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ सहाव्या फेरीनंतर माघारत असल्याने आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा या निवडणुकीत बाजी मारतील, असे मानले जात आहे.

सातव्या फेरीअखेर आनंदराव अडसूळ यांनी 2 लाख 45 हजार मते घेतली होती तर नवनीत राणा यांनी 2 लाख 63 हजार मते घेऊन तब्बल 17 हजार 314 मतांची आघाडी घेतली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP alliance leading in Vidarbha for Lok Sabha 2019