Loksabha 2019 : ‘आप कहा हो’?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 मार्च 2019

नागपूरमध्ये यासाठी  भांडणेही झाली होती. मात्र, साडेचार वर्षांतच पक्षाची वाताहत झाली. आता लोकसभा लढायलाही इच्छुक उमेदवारही पक्षाकडे नसून मतदारांना ‘आप कहा हो’ अशी विचारणा करावी लागत आहे.

नागपूर - मागील निवडणुकीच्या दरम्यान आम आदमी पक्षाचे प्रचंड आकर्षण मतदार आणि उमेदवारांमध्ये होते. प्रत्येकाला ‘आप’ची उमेदवारी हवी होती. नागपूरमध्ये यासाठी  भांडणेही झाली होती. मात्र, साडेचार वर्षांतच पक्षाची वाताहत झाली. आता लोकसभा लढायलाही इच्छुक उमेदवारही पक्षाकडे नसून मतदारांना ‘आप कहा हो’ अशी विचारणा करावी लागत आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून आम आदमी पक्षाचा जन्म झाला. अरविंद केजरीवाल, माजी पोलिस आयुक्त किरण बेदी, कुमार विश्‍वास, अंजली दमानिया अशी अनेक नावाजलेली मंडळी एकत्र आली होती. ‘आप’ देशात क्रांती घडवेल अशी हवा तयार झाली होती. अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सर केली. दिल्लीतील शीला दीक्षित यांची राजवट त्यांनी संपुष्टात आणली. भाजपचे दिल्ली काबीज करण्याचे स्वप्नही केजरीवाल यांनी भंग केले. राजधानीतून निर्माण झालेली लाट महाराष्ट्रातही बराच काळ घोंगावत होती. २०१४च्या निवडणुकीत नितीन गडकरी यांचा पराभव करण्याचा विडाच ‘आप’ने उचलला होता. ‘आप’च्या तत्कालीन पदाधिकारी अंजली दमानिया यांना नागपूरमध्ये लोकसभेची निवडणूक लढविण्यास पाठविण्यात आले होते. तत्पूर्वी दमानिया यांनी नितीन गडकरी यांच्या विरोधात पत्रकार परिषदा घेऊन वातावरण निर्मिती केली होती. नागपूरमध्येही आपमधून लढण्यास अनेक इच्छुक होते. त्यात जम्मू आनंद यांचेही नाव घ्यावे लागले. मात्र, दमानिया यांना उमेदवारी देताच त्यांनी बंड पुकारले. 

आम आदमी पक्षाच्या नावाने मोहन कारेमोरे यांनी दुसरी संघटना तयार केली. दमानिया यांनी उमेदवारी अर्ज भरताच फाटाफूट व्हायला सुरुवात झाली. आपमध्ये घुसवण्यात आलेले अनेक कार्यकर्ते भाजपात परतले. शेवटी शेवटी दमानिया यांना प्रचारासाठी पुरेसे कार्यकर्तेही मिळनासे झाले होते. असे असले तरी आपच्या उमेदवार अंजली दमानिया यांनी ६९ हजार मते घेतली. 

भाजपचे नितीन गडकरी आणि काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांच्या मताधिक्‍यांमध्ये  तब्बल पावणेतीन लाखांचा फरक असल्याने आपच्या मतांची फारशी दखल कोणी घेतली नाही. यानंतरचा आपचा कार्यकाळ सर्वांनाच ठाऊक आहे. आज आप लोकसभेच्या निवडणूक लढण्याचीही शक्‍यता सध्यातरी दिसत नाही. एखाद्या हौशी उमेदवाराने लढण्याची तयारी दर्शवली तरी ती फक्त औपचारिकताच ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 : Aam Aadmi Party status