Loksabha 2019 : चुरस वाढली; काट्याचीच टक्कर

सुरेंद्र चापोरकर
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

मतदारसंघातील प्रमुख प्रश्‍न
    नांदगावपेठ एमआयडीसीमध्ये सार्वजनिक उद्योगांची आवश्‍यकता 
    अमरावतीतून विमानसेवेचा मुद्दा प्रलंबित
    शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर प्रलंबितच

अमरावती मतदारसंघावर पुन्हा एकदा आनंदराव अडसूळ यांच्या रूपाने भगवा फडकाविण्याच्या दृष्टीने युतीच्या नेत्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यातून खेचून आणण्यासाठी चंग बांधलाय. त्यामुळे अमरावतीत काट्याचीच टक्कर पाहायला मिळणार आहे. 

सद्यास्थितीत मतदारसंघातील चार उमेदवार बलाढ्य मानले जात असले, तरी खरी लढत आनंदराव अडसूळ विरुद्ध नवनीत राणा अशीच होणार आहे. मात्र, २०१४ ची स्थिती आणि आजच्या स्थितीत फार तफावत आहे. नवनीत राणा या ‘राष्ट्रवादी’च्या नव्हे; तर त्यांच्या ‘युवा स्वाभिमान पक्षा’च्या चिन्हावर रिंगणात आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी स्वतःला प्रचारात झोकून दिल्याचे दिसत नाही. वंचित बहुजन आघाडीचे गुणवंत देवपारे आणि बसपचे अरुण वानखडे किती मते घेतात, यावरच राणा यांच्या मतांची बेरीज व वजाबाकीचे गणित अवलंबून आहे. 

निवडणूक चिन्हावरून नवनीत राणा यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. सहा महिन्यांपासून त्यांनी ‘टीव्ही’ या निवडणूक चिन्हाचा प्रसार आणि प्रचार करीत मेळघाटसह संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. मात्र, प्रत्यक्षात  त्यांना वेगळेच चिन्ह मिळाले. त्यामुळे ते मतदारांपर्यंत पोचविण्याचे आव्हान राणा दांपत्यासमोर आहे. दुसरीकडे पाच वेळा लोकसभेत पोचलेल्या आनंदराव अडसूळ यांची निवडणूक व्यवस्थापनात सक्षम यंत्रणा ताकदीने मैदानात उतरली आहे. त्यातच त्यांना भाजपच्या बूथनिहाय यंत्रणेची साथ आहे.

मेळघाटावर दोन्हीही उमेदवारांनी जोर दिला आहे. अमरावतीत मराठा समाजाची मते मोठ्या प्रमाणात असल्याने हा समाज कुणाच्या बाजूने कौल देतो, यावर खूप अवलंबून असेल. बसप; तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कशा पद्धतीने मते खेचतात, त्यावर उमेदवाराचे विजयाचे गणित निश्‍चित होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Amravati Constituency Politics