Loksabha 2019 : भाजपच्या दौडीला विदर्भात लगाम?

दीपा कदम
बुधवार, 10 एप्रिल 2019

राहुल गांधींना ऐकले जातेय...
नागपूर, वर्धा, चंद्रपूर येथे गेल्या दहा दिवसांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या तीन सभा झाल्या. या तिन्ही सभांना झालेल्या तुफान गर्दीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. गेल्या वेळीही राहुल गांधींनी विदर्भात सभा घेतल्या होत्या. मात्र हिंदी भाषेवर पकड नसल्याने त्यांचे भाषण लोकांपर्यंत पोचतच नव्हते. या वेळी मात्र तसे झाले नाही. त्यांना स्वीकारले जाण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे या वेळी प्रकर्षाने जाणवले.

पूर्व विदर्भातील सात लोकसभा मतदारसंघांतील निवडणूक प्रचाराची आज सांगता झाली. गेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातूनच मोदी लाटेची सुरवात झाली होती. मात्र पाच वर्षानंतर मोदी लाट दिसत नसली तरी, त्यांचा प्रभाव आहे. पूर्व विदर्भाच्या सातही जागा खिशात टाकण्याचा युतीचा आत्मविश्‍वास शेवटच्या टप्प्यात ‘फिफ्टी फिफ्टी’वर आला, यातूनच निवडणुकीची रंगत लक्षात येईल.

भाजपचा बेरंग करण्यामध्ये विदर्भातील कुणबी, मुस्लिम आणि आदिवासी समाजाने महत्त्वाची भूमिका बजावण्यास सुरवात केल्याने विदर्भातून खात्रीशीर वाटणाऱ्या जागाही भाजप-शिवसेनेसाठी तितक्‍या सहज राहिलेल्या नाहीत. मराठा आरक्षणामुळे अस्वस्थ झालेला कुणबी समाज भाजप, शिवसेनेच्या विरोधात मतदान करण्याची शक्‍यता असल्यानेच राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते पूर्व विदर्भातील प्रचारापासून दूर राहिले. 

२०१४ मध्येसुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नापिकी, बेरोजगारी, कर्जमाफीसारखेच मुद्दे प्रचारात होते, जे आजही आहेत. मात्र गेल्यावेळेसारखी झपाटून टाकणारी लाट नाही, तरी मोदींच्या नावावर मतदान होण्याची शक्‍यता आहे. शिवाय निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाल्यापासून या सातही मतदारसंघांतील जवळपास ४० ते ५० टक्‍के शेतकऱ्यांच्या खात्यांवर दुष्काळी मदतीचे दोन हजार रुपये जमा झाले आहेत. ग्रामीण भागात दोन हजार रुपये ही आजही मोठी रक्‍कम आहे, त्याचा निश्‍चितच परिणाम होईल. 

पूर्व विदर्भ गणित बिघडविणार
पूर्व विदर्भातल्या सातही जागांनी भाजप-शिवसेनेला मेटाकुटीस आणले आहे. शेवटच्या टप्प्यातील नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सभा थातूरमातूर कारणे देऊन रद्द कराव्या लागल्या यातूनच परिस्थिती लक्षात येते. नागपूरमधून काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले आणि चंद्रपूरमधून बाळू धानोरकर यांना उमेदवारी दिल्याचा फायदा काँग्रेसच्या वर्ध्याच्या उमेदवार चारुलता टोकस आणि यवतमाळचे काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनादेखील मिळू लागला आहे. या चारही उमेदवारांसाठी कुणबी समाजाचा कल काँग्रेसच्या दिशेने वळलेला दिसतोय. दुसरे महत्त्वाचे कारण मराठा समाजाला मागासवर्गात दिलेल्या आरक्षणामुळे विदर्भात कुणबी समाजात नाराजी आहे. त्याचा फटका भाजपला बसेल. कुणबी समाजात असलेला या रागाचा सकारात्मक फायदा व्हावा यासाठीच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मराठा नेत्यांच्या सभा पूर्व विदर्भात झाल्या नाहीत. पृथ्वीराज चव्हाण यांची गडचिरोलीतली एक सभा सोडली तर मराठा नेते विदर्भापासून सोयीस्कर दूर राहिल्याचे दिसते.

बंजारा, मुस्लिम, दलित आणि आदिवासी या मतदारांनीदेखील सोयीच्या जागा आतापर्यंत निवडल्या आहेत. यवतमाळमध्ये बंजारा समाज मोठ्या प्रमाणात आहे. काँग्रेसचे माजी नेते मनोहर नाईकांनंतर शिवसेनेचे संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली बंजारा समाज एकजूट झाला आहे. ते ज्याच्या पदरात मते टाकतील त्यांच्यासाठी विजय सुकर होईल. काँग्रेसला तारणाऱ्यांमध्ये या वेळी मुस्लिम मतांची महत्त्वाची भूमिका असू शकते. यवतमाळ, नागपूरमध्ये याचे परिणाम दिसू शकतील. 

आदिवासींची नाराजी
आदिवासींच्या वन हक्‍क जमिनीच्या प्रश्‍नांमुळे त्यांच्यामध्येही नाराजी आहे. नक्षलवादाच्या नावाखाली आदिवासी पट्ट्यातील पायाभूत सुविधा, रोजगाराकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. काँग्रेसचे उमेदवार नामदेव उसेडींना त्याचा फायदा मिळत आहे. रामटेकमध्ये किशोर गजभियेंच्या विरोधात खासदार कृपाल तुमानेंची लढत उल्लेखनीय ठरेल. २०१४ मध्ये काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांचा तुमानेंनी पराभव केला होता.

पहिल्या टप्प्याच्या प्रचारात नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्या सभा सोडल्या तर उमेदवारांनीच त्यांच्या जोरावर प्रचार पुढे रेटला. प्रचार फार रंगलेला दिसला नसला तरी इथले निकाल मात्र रंगतदार आणि धक्‍कादायक ठरू शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 BJP Vidarbha Politics Narendra Modi Speech