Loksabha 2019 : पहले लडे थे गोरों से, अब लडेंगे चोरों से - छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

चोरी करण्यात भाजप नंबर एक - चव्हाण 
सत्तेचा वापर केवळ पैसा गोळा करण्यासाठी होत आहे. देशाची चोरी करण्यात भाजप एक नंबर असल्याची टीका माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी केली. पंतप्रधानांच्या नावाने चिठ्ठी लिहून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. नोटाबंदीमुळे ५० टक्के व्यापार बुडाला. मोठ्या प्रमाणात बेरोजगार वाढली. रोजगारात पुढे असलेला महाराष्ट्र आज शेतकरी आत्महत्येत पुढे आहे. या सरकारकडून लोकांचा भ्रमनिरास झाला असून सरकारला सडेतोड उत्तर देण्याची गरज त्यांनी व्यक्‍त केली.

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्व आश्‍वासनांचा विसर पडला असून केंद्र सरकार जाती, धर्माच्या नावावर फूट पाडत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज केला. या सरकारला उलथवून टाकण्याचे आवाहन करतानाच त्यांनी ‘काँग्रेस लड रही जोरों से, पहले लडे थे गोरों से, अब लडेंगे चोरों से’ अशी घोषणा दिली. 

काँग्रेस, राष्ट्रवादी व इतर मित्र पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कस्तुरचंद पार्क मैदानावर आयोजित जाहीर सभेत काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ते बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक, आमदार सुनील केदार, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, आमदार प्रकाश गजभिये, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री नितीन राऊत, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आमदार डॉ. आशीष देशमुख, शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, अनीस अहमद, रमेश बंग, प्रफुल्ल गुडधे पाटील, ॲड. अभिजित वंजारी, अतुल लोंढे यांच्यासह नागपूरचे उमेदवार नाना पटोले, रामटेकचे किशोर गजभिये उपस्थित होते.

भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी उपस्थितांना ‘अच्छे दिन’ आले काय? १५ लाख खात्यात आले काय? असा सवाल करीत त्यांनी पतंप्रधानांवर ताशेरे ओढले. एका दिवसात कष्टाने कमावलेल्या पैशाचे कागद करीत नोटाबंदी लादली. यातून १ कोटी व्यवसाय बुडाले. 

आजही हे व्यावसायिक उभे राहू शकले नाहीत. काळा पैसा जमा होईल, दहशतवाद संपुष्टात येईल, असे मोठी दावे केले गेले. परंतु दहशतवाद आणखी वाढल्याचे नमूद करीत भुजबळ यांनी नोटबांदी फसल्याचे सांगितले.

केंद्र सरकार केवळ विविध समुदायांत फूट पाडण्याचे काम करीत आहे. पानसरे, दाभोलकर प्रकरणातून उच्च न्यायालय जाब विचारत आहे, असे सांगून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही खरपूस समाचार घेतला. 
राफेल प्रकरण राहुल गांधी यांनी बाहेर काढले. या प्रकरणाची फाइलच गहाळ करण्यात आल्याचे ते म्हणाले. महागाई शिगेला पोहोचली असून काँग्रेसच्या काळात खिशात पैसे घेऊन खरेदीस गेल्यास गोणीभर सामान घरात येत होते. आता पुन्हा भाजप सरकार आल्यास गोणीभर पैशांमध्ये खिशातही सामान येणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या सभेसाठी समन्वयक म्हणून आशिष दुआ यांनी जबाबदारी पार पाडली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Chhagan Bhujbal Politics NCP BJP