Loksabha 2019 : काँग्रेसचा जाहीरनामा देशद्रोहींना खूश करणारा - सुषमा स्वराज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

पिक्‍चर अभी बाकी हैं - गडकरी
गेल्या पाच वर्षांत ७० हजार कोटींची कामे शहरासाठी मंजूर केली. मिहान, बुटीबोरी आदी ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला. आतापर्यंत जी कामे झाली ते केवळ ट्रेलर होती, ‘पिक्‍चर अभी बाकी है’, असे नमूद करीत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी कार्यकर्त्यांना तुम्हीच उमेदवार, कार्यकर्ते असून विजयही तुमचाच असेल, त्यामुळे मताधिक्‍य वाढवा, असे आवाहन केले.

नागपूर - केंद्रात सत्तेत आल्यास देशद्रोहाचा गुन्हा ठरविणारे कलम रद्द करण्याच्या जाहीरनाम्यातील आश्‍वासनावरून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर तोंडसुख घेतले. काँग्रेसचे घोषणापत्र देशद्रोहासारख्या गुन्हेगारांना खूष करणारे असल्याची टीका त्यांनी केली. 

जगनाडे चौकातील रिजेंटा हॉटेलमध्ये केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी भाजपतर्फे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महापौर नंदा जिचकार, कांचन गडकरी, शहर भाजपाध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, माजी महापौर अर्चना डेहनकर, हरियानाच्या भाजप महिला आघाडी उपाध्यक्षा सोनाली फोगट, शहर भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा कीर्तिदा अजमेरा उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घोषणापत्रात देशद्रोहाचा गुन्हा ठरविणारे भारतीय दंड संहितेतील कलम रद्द करण्यात येईल, अशी घोषणा केली. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राइकने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देत आहेत, त्याचवेळी काँग्रेस अध्यक्ष देशद्रोहींना गुन्हेगार मानण्यास तयार नसल्याचे दिसून येते. परंतु जनता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करील, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

महिलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या उज्ज्वल योजना, सुकन्या योजना, गर्भवतींसाठी पोषण आहार योजना व सहा महिन्यांची वेतनासह रजेच्या योजनेचे फायदे सांगतानाच मुद्रा कर्ज योजनेतून अनेक महिलांना रोजगार सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी देशात रस्ते विकासाचा इतिहास निर्माण केला असून, नागपुरातही हाच इतिहास घडताना दिसून येत असल्याचे नमूद केले. त्यामुळे त्यांना पुन्हा संसेदत पाठवा, असे आवाहन उपस्थितांना केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Congress Declaration Sushma Swaraj