Loksabha 2019 : निकालासाठी उजाडेल दुसरा दिवस!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मे 2019

ईव्हीएमसाठी तोडणार भिंत
कळमना येथील एपीएमसी मार्केट परिसरात नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी स्ट्राँग रूम तयार करण्यात आले आहे. याला तीनस्तरीय पोलिस सुरक्षा असून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या स्ट्राँग रूमला तीन दरवाजे असून यातील दोन दरवाजे विटांनी बंद करण्यात आले आहे. मतमोजणीच्या दिवशी ही भिंत तोडावी लागणार आहे. येथून हे ईव्हीएम वाहनाच्या माध्यमातून ५०० मीटर दूर असलेल्या मतमोजणी केंद्रापर्यंत आणल्या जातील. यावेळी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील.

एका फेरीच्या मोजणीला लागणार ४५ मिनिटे; सरासरी १७ ते २० फेऱ्या 
नागपूर - लोकसभा निकालाची सर्वांना उत्सुकता लागली असून २३ तारखेला मोजणीला सुरुवात होणार असली तरी अंतिम निकाल हाती यायला दुसरा दिवस उजाडणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना रात्र जागून काढावी लागणार असून उमेदवारांची धाकधूक एक दिवस वाढणार आहे.

जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल. प्रथम बॅलेट पेपरची मोजणी होईल. सकाळी ८.३० वाजता ईव्हीएममधील मतमोजणीला सुरुवात होईल. जिल्हा प्रशासनाने २० टेबलचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यानुसार सरासरी १७ ते २० राउंड (फेऱ्या) होतील. निवडणूक आयोगाने एका राउंडच्या मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय दुसरी सुरू करू नये, असे आदेश दिले आहे. एक फेरी पूर्ण व्हायला साधारणत: ४० ते ४५ मिनिटांचा वेळ लागणार आहे. शिवाय प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटची मोजणी करायची आहे. यातही बराच वेळ जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. रामटेक आणि नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी करता दोन स्वतंत्र शेड तयार करण्यात येणार असून याचे काम शुक्रवारपासून सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, जिल्हा उपनिवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शाहा, अनिल गडेकर उपस्थित होते.

बिघाड झालेल्या ईव्हीएमची सर्वांत शेवटी मोजणी
मतदानानंतर बॅलेट युनिटचे ‘क्‍लोज’ बटण दाबणे आवश्‍यक आहे. चुकीने ती बटण न दाबल्यास कुणाला किती मत गेले याचा आकडा दिसत नाही. मोजणीच्या दिवशी अशी घटना घडल्यास त्या ईव्हीएम बाजूला काढून ठेवण्यात येतील. सर्व ईव्हीएमची मोजणी झाल्यावर या ईव्हीएममधील क्‍लोज बटण दाबून त्यातील निकाल जाहीर होईल, असे मुद्‌गल यांनी सांगितले.

टेबलनिहाय मतमोजणीच्या फेऱ्या (संभाव्य)
निवडणूक आयोगाने १४ टेबल तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने मात्र मोजणीसाठी २० टेबलचा प्रस्ताव आयोगाला पाठविला आहे. त्यानुसार खालीलप्रमाणे विधानसभा मतदारसंघ निहाय फेऱ्या होतील.

टपाल पेपरचे साडेतीन हजार अर्ज रद्द
प्रशासनाकडे रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या टपाल मतपत्रिकेसाठी एकूण २४ हजार २५१ वर अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी अनेक अर्जांवर मतदारयादी तपशील, अर्जदाराचा पत्ता व स्वाक्षरी नसणे, अनुक्रमांक योग्यरित्या न भरणे, नियुक्ती आदेशाची प्रत न जोडणे आणि विहित कालमर्यादेत न पाठविल्याने ३ हजार ५७९ अर्ज छाननीनंतर रद्द करण्यात आले. मतदानासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी ६ हजार १३९ अर्ज इतर जिल्ह्यातील असल्यामुळे हे अर्ज संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात टपाली मतपत्रिकेसाठी १३ हजार ७३१ अर्ज प्राप्त झाले होते.

त्यापैकी २ हजार ७१ अर्ज रद्द ठरविण्यात आले होते. ६ हजार ४५८ अर्ज टपालाद्वारे तर इतर मतदारसंघातील ५ हजार २०२ अर्जदार संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. तसेच नागपूर लोकसभा मतदारसंघातील कर्मचाऱ्यांकडून १० हजार ५२० अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १ हजार ५०० अर्ज रद्द करण्यात आले. ८ हजार ७५ अर्जदारांना टपालाद्वारे मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. इतर मतदारसंघातील ९३७ अर्जदारांचे अर्ज संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत.

मॉक पोलचीही मोजणी
मतदानाच्या दिवशी प्रथम मॉक पोल घेण्यात आले. मॉक पोलचा डाटा इरेज (मिटविणे) करणे आवश्‍यक आहे. नागपूरमध्ये चार तर रामटेकमध्ये चार मतदान केंद्रांवरील मॉक पोलचा डाटा नष्ट करण्यात आला नाही. याची माहिती आयोगाला देण्यात आली आहे. त्यांच्या आदेशानुसार प्रसंगी या सर्व मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटची मोजणी करून मत निश्‍चित करण्यात येतील, अशी माहिती मुद्‌गल यांनी दिली.

नागपूर लोकसभा मतदारसंघात ५३ तक्रारी आल्यात. यात काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या ५१ तक्रारी आहेत. ईव्हीएम, आचारसंहिता भंग, कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट न मिळणे, सीसीटीव्ही संदर्भातील तक्रारी आहेत. चार तक्रारी रामटेक लोकसभा मतदारसंघातील असून या सर्व काँग्रेस उमेदवार किशोर गजभिये यांच्या आहेत. या सर्व तक्रारींवर उत्तरही देण्यात आले आहे. 
- अश्‍विन मुद्‌गल, जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Nagpur Constituency Result