Loksabha 2019 : नवनीत राणा ठरल्या आघाडीच्या उमेदवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मार्च 2019

मुंबईत झालेल्या आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत नवनीत राणा यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. अमरावती मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुटला आहे.

अमरावती - अमरावती लोकसभा मतदारसंघातील रणधुमाळीचे चित्र स्पष्ट झाले असून युवा स्वाभिमान पक्षाच्या मार्गदर्शिका नवनीत राणा संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या उमेदवार राहणार आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, युवा स्वाभिमानच्या नवनीत राणा आणि वंचित आघाडीचे गुणवंत देवपारे अशी लढत रंगणार आहे.

मुंबईत झालेल्या आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत नवनीत राणा यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. अमरावती मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुटला आहे. 

मात्र, राष्ट्रवादीच्या चिन्हावर ही निवडणूक न लढविता युवा स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून लढविण्याचा आग्रह नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी धरला होता. याच विषयावर गेल्या काही दिवसांपासून त्यांची राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी सातत्याने चर्चा सुरू होती. दरम्यान, हा मतदारसंघ आघाडीत काँग्रेसला देण्याचा निर्णय झाल्याचीही चर्चा होती. नवनीत राणा यांना राष्ट्रवादीच्या चिन्हावरच निवडणूक लढविण्याचा सल्ला राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला होता. पुरोगामी आघाडीने आपल्याला पाठिंबा द्यावा अशी त्यांची मागणी होती. या विषयावर बऱ्याच दिवसांपासून खल सुरू असल्याने अमरावतीत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर आज मुंबईत यासंदर्भात अधिकृत घोषणा झाल्याने अमरावती लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

हम साथ-साथ हैं !
संयुक्त पुरोगामी महाआघाडीत ५६ पक्ष व संघटना एकत्र आल्या असून त्यांनी नवनीत राणा यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे युवा स्वाभिमान पक्षाकडून आम्ही निवडणूक लढविणार आहोत. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नवनीत राणा यांचे काम करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आम्ही सर्व सोबत आहोत, असे आमदार रवी राणा यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 navnit rana kaur politics aghadi candidate