esakal | Loksabha 2019 : विदर्भात बहुतांश ठिकाणी थेट लढतींचे चित्र
sakal

बोलून बातमी शोधा

Loksabha 2019 : विदर्भात बहुतांश ठिकाणी थेट लढतींचे चित्र

विदर्भातील सर्वांत लक्षणीय लढत होतेय ती नागपुरात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे नाना पटोले यांचा हा सामना असेल. इतर पक्षांचे उमेदवार कितपत लक्ष वेधू शकतील, यात शंका आहे.

Loksabha 2019 : विदर्भात बहुतांश ठिकाणी थेट लढतींचे चित्र

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नागपूर - विदर्भातील भंडारा आणि अकोला लोकसभा मतदारसंघवगळता इतर ठिकाणचे आघाडी आणि युतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. निवडणुकीचे एकूणच चित्र बघितले, तर विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघांत बव्हंशी थेट लढतीचे स्पष्ट संकेत आहेत. इतर उमेदवारांचा तिहेरी लढती रंगवण्याचा इरादा असला तरी त्यात त्यांना कितपत यश येते, हे आताच सांगता येत नाही. भंडारा मतदारसंघाचा भाजप आणि राष्ट्रवादीचा उमेदवार लवकरच ठरेल. अकोला येथे काँग्रेसचा उमेदवार कोण राहील, यावरही खल सुरू आहे.

विदर्भातील सर्वांत लक्षणीय लढत होतेय ती नागपुरात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे नाना पटोले यांचा हा सामना असेल. इतर पक्षांचे उमेदवार कितपत लक्ष वेधू शकतील, यात शंका आहे. बहुजन सोशालिस्ट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष सुरेश माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बसपने उमदेवार जाहीर केला नाही. वंचित बहुजन आघाडी आणि बसप हे दोन पक्ष मोठ्या प्रमाणात मत विभाजन करू शकतात. 
यवतमाळ-वाशीम लोकसभेसाठी माणिकराव ठाकरे यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून, तर शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना भाजप-सेना युतीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाकडून ९२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटक वैशाली येडे तसेच अपक्ष म्हणून आध्यात्मिक गुरू प्रेमासाई महाराज यांनी उमेदवारी दाखल केली आहे. या मतदारसंघात युती व आघाडीतच सरळ सामना होणार आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ व युवा स्वाभिमान पक्षाच्या नवनीत राणा यांच्यात लढत आहे. नवनीत राणा यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने पाठिंबा दिला आहे. वंचित बहुजन आघाडीचे गुणवंत देवपारे या लढतीला तिरंगी केले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी  आघाडीने नवनीत राणा यांना पाठिंबा दिल्याची अधिकृत घोषणा आज केली. त्यांना आघाडीचे स्थानिक नेते  कितपत मदत करतात हे काळच सांगणार आहे. देवपारे यांनी गेल्या निवडणुकीत चांगलीच मजल मारली होती. त्यामुळे यंदासुद्धा त्यांना ‘अंडरइस्टिमेट’ करून चालणार नाही. 
भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांनी उमेदवार जाहीर केले नाहीत. त्यामुळे चर्चेत असलेल्या नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. आतापर्यंत भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके, सुनील मेंढे, खुशाल बोपचे, डॉ. प्रकाश मालगावे, रमेशकुमार कुथे यांनी अर्जांची उचल केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना पंचबुद्धे, अनिल बावनकर, विजय शिवणकर यांनीही अर्ज घेतले आहेत. आतापर्यंत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, बीएसपी यापैकी कुणीही उमेदवार घोषित केलेला नाही. यामुळे या मतदारसंघातील लढतीबद्दल उत्कंठा वाढलेली आहे.
गडचिरोली मतदारसंघात भाजप व काँग्रेसचे उमेदवार जाहीर झाले. मात्र, तिकीट वाटपावरून दोन्ही पक्षांत संघर्ष शिगेला पोहोचला आहे. यामुळे उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. पान २ वर 


वंचित बहुजन आघाडीतर्फे रमेश गजबे यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र, भाजप विरुद्ध काँग्रेस असाच सामना येथे होणार आहे.

वर्धा मतदारसंघात भाजपकडून खासदार रामदास तडस आणि काँग्रेसतर्फे महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. चारुलता टोकस यांनी उमेदवारी दाखल केली आहे. या दोन उमेदवारांत थेट लढत होईल, असे सध्याचे चित्र आहे.

बसपने अद्याप उमेदवाराची घोषणा केली नाही. काँग्रेसकडून राष्ट्रीय मुद्द्यांसह मतदारसंघातील मुद्द्यांना हात घातला जाऊ शकतो. मतदारसंघात कुणबी आणि तैलिक समाजाची मोठी संख्या आहे. या दोन समाजांचे राजकीय ध्रुवीकरण करण्याचाही प्रयत्न होऊ शकतो. बहुजन वंचित आघाडीकडून माजी पोलिस आयुक्त धनराज वंजारी निवडणूक लढवीत आहेत.

अकोला मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार संजय धोत्रे यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसला अद्यापही उमेदवार सापडलेला नाही. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर या मतदारसंघातून निवडणूक लढविणार काय, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. आंबेडकर सोलापूरमधून निवडणूक लढविणार, असे सांगितले जाते. मात्र, अकोला मतदारसंघातही उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात, असेही कार्यकर्त्यांना वाटत आहे. असे झाल्यास येथे तिहेरी लढत होईल आणि अर्थातच नेहमीप्रमाणे त्याचा फायदा धोत्रेंना होईल. 

बुलडाणा मतदारसंघात राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे आणि भाजप-शिवसेना युतीचे प्रतापराव जाधव यांच्यात सामना होईल. वंचित बहुजन आघाडीचे  उमेदवार आमदार बळीराम सिरस्कार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीत तिहेरी लढतीसाठी कितपत यशस्वी होते, हे निवडणुकीच्या निकालानंतरच दिसून येईल. 

भाजपने चंद्रपुरातून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची उमेदवारी गृहीत धरून बऱ्याच आधी तयारी सुरू केली. दुसरीकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस उरलेले असतानाही काँग्रेसमधील उमेदवारीचा घोळ सुटला नाही. विशाल मुत्तेमवार यांच्यानंतर आता पक्षाने विनायक बांगडे यांचे नाव काँग्रेसचे उमेदवार म्हणून घोषित केले. शिवसेनेचे माजी आमदार बाळू धानोरकर यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. ते अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. इथेही थेट लढतीची चिन्हे आहेत.

रामटेकचा घोळ कायम
रामटेक मतदारसंघात काँग्रेसमध्ये उमेदवारीचा घोळ कायम आहे. मुकुल वासनिक की नितीन राऊत की किशोर गजभिये, असा खल सुरू आहे. वासनिक सध्या निवडणूक लढण्यास उत्सुक नसल्याची चर्चा आहे. शिवसेनेने विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे किरण पाटणकर यांना उमेदवारी मिळाली आहे. यापूर्वी त्यांनी बसपतर्फे निवडणूक लढविली होती.?

loading image