Loksabha 2019 : सरळ लढत, मात्र मतविभाजनावर भिस्त

राजकुमार भितकर
मंगळवार, 2 एप्रिल 2019

यवतमाळ-वाशीम मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे आणि शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार खासदार भावना गवळी यांच्यात सरळ लढतीची चिन्हे आहेत. मात्र, उल्लेखनीय अपक्ष उमेदवारांचे आव्हान दोघांच्याही मतांना खिंडार पाडणारे ठरू शकते. मतविभाजनच निवडणुकीचा निकाल निश्‍चित करणार आहे.

यवतमाळ-वाशीम मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे आणि शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार खासदार भावना गवळी यांच्यात सरळ लढतीची चिन्हे आहेत. मात्र, उल्लेखनीय अपक्ष उमेदवारांचे आव्हान दोघांच्याही मतांना खिंडार पाडणारे ठरू शकते. मतविभाजनच निवडणुकीचा निकाल निश्‍चित करणार आहे.

मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, राळेगाव, दिग्रस व पुसद आणि वाशीम जिल्ह्यातील वाशीम व कारंजा या अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ त्यांच्यातीलच अंतर्गत बंडाळीमुळे अलीकडे शिवसेनेचा गड झालाय. मतदारसंघातील चार विधानसभांमध्ये भाजपचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक आमदार आहे. काँग्रेसचा एकही आमदार नाही. मराठा, कुणबी, बंजारा, दलित, मुस्लिम आणि आदिवासी मते निर्णायक आहेत. तसेच, आंध, माळी, धनगर व तेली समाजांचीही मते भरपूर आहेत. काँग्रेस विचारधारेचा मतदारसंघ असताना २०१४ मध्ये मोदी लाटेत भाजपचे अनेक कार्यकर्ते आमदार झालेत. पुसद हा नाईकांचा गड असल्याने तेवढा एक बुरुज राष्ट्रवादीने राखलाय. या वेळच्या ‘सुप्त मोदी लाटे’चा फायदा शिवसेनेच्या उमेदवारास होईल. 

खासदार भावना गवळी दहा वर्षांपासून मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. दरम्यान, मतदारसंघात वर्धा-नांदेड रेल्वे सोडल्यास विकासकामे झाली नाहीत. उद्योगधंदे नाहीत. बेरोजगारीचा प्रश्‍न कायम आहे. असे अनेक कळीचे प्रश्‍न आहेत. त्यामुळे जनता या वेळी त्यांना जाब विचारत आहे. शिवाय शिवसेनेतही गटबाजी आहे. भाजपचे आमदार लोकसभेच्या निवडणुकीआड विधानसभेची तयारी करीत आहेत. तीच परिस्थिती काँग्रेसमध्ये आहे.

दोन्ही उमेदवारांसमोर ‘प्रहार’च्या वैशाली येडे यांचे मोठे आव्हान आहे. त्या शेतकरी विधवा असून, ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटक होत्या. आध्यात्मिक गुरू प्रेमासाई महाराज यांचेही आव्हान काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांसमोर आहे. वंचित आघाडीचे प्रवीण पवार हेसुद्धा रिंगणात आहेतच. राजकीय, जातीय समीकरणांचा विचार करता विजयाचा मार्ग हा मतविभाजनातून जाताना दिसतो. युतीच्या मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन होईल, असे चित्र आहे. यावर मात्र भाजप-शिवसेना नेत्यांनी संधी असतानाही मलमपट्टीदेखील केलेली दिसत नाही.  

बंजारा मतांचे विभाजन
भाजपचे बंडखोर नेते परशराम आडे, बोरसिकवाडी संघटनेचे अपक्ष उमेदवार प्रा. अनिल पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रा. प्रवीण पवार, पुसदच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपक्ष उमेदवार सिंपल राठोड आदी बंजारा समाजातील उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे ज्या बंजारा समाजावर शिवसेनेची भिस्त आहे, त्याच मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन होण्याची शक्‍यता आहे. एकूण जातीनिहाय मतांचा विचार केल्यास काँग्रेसला फायदा, तर शिवसेनेच्या उमेदवारांचे मतविभाजन होताना दिसतंय.

मतदारसंघातील प्रमुख प्रश्न 
    औद्योगिक वसाहती ओसाड, रोजगार नाही
    पुरेशा शैक्षणिक सुविधा नाहीत
    शेतकरी चिंताग्रस्त, दुष्काळाने बेजार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Politics yavatmal Washim Constituency