विदर्भ - मोदी लाटेचा प्रभाव कायम

शैलेश पांडे
शुक्रवार, 24 मे 2019

काँग्रेसच्या मातब्बरांना धूळ चारत भाजप- शिवसेना युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. विदर्भातदेखील मोदी लाट सुप्तपणे कार्यरत होती, हेच निकालातून दिसून आले.

काँग्रेसच्या मातब्बरांना धूळ चारत भाजप- शिवसेना युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. विदर्भातदेखील मोदी लाट सुप्तपणे कार्यरत होती, हेच निकालातून दिसून आले.

विदर्भ नेहमी राष्ट्रीय प्रवाहासोबत राहतो, असा अनुभव आहे. कधीकाळी हा प्रदेश काँग्रेसचा बालेकिल्ला होता. अगदी पंधरा- सोळा वर्षांपूर्वी येथे बहुसंख्य खासदार काँग्रेस आणि मित्रपक्षांचे होते. २०१४ च्या निवडणुकीपासून हे चित्र बदलले, युतीचे थोडेसे नुकसान झाले असले तरी देशातील मोदी लाटेचा प्रभाव विदर्भातही जाणवला. त्यामुळे विदर्भातील दहापैकी ८ जागा युतीच्या (५ भाजप, ३ शिवसेना) वाट्याला गेल्या आहेत. काँग्रेसच्या वाट्याला एकमेव चंद्रपूरची जागा निर्णायकपणे येण्याची शक्‍यता आहे. कोणत्याही पक्षाचे तिकीट न घेता राष्ट्रवादीच्या समर्थनावर अमरावतीतून लढलेल्या नवनीत राणा यांनी विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. ही जागा शिवसेनेची आहे. 

मध्य भारताला लागून असलेल्या आणि राज्य म्हणून पश्‍चिम भारताचा भाग असलेल्या महाराष्ट्रातील विदर्भातदेखील मोदींच्या सुप्त लाटेचा प्रभाव कायम असल्याचे या निवडणुकीत दिसून आले. भंडारा- गोंदियातून सुनील मेंढे यांच्यासारखा भाजपचा अगदी नवखा चेहरा सामोरा येणे ही मोदी लाटेची आणि राष्ट्रवादाच्या प्रचाराचीच कमाल मानली पाहिजे. काँग्रेसचे मातब्बर उमेदवार या वेळी विदर्भातून रिंगणात होते. त्यात यवतमाळ- वाशीममधून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, नागपुरातून अ. भा. किसान काँग्रेसचे प्रमुख नाना पटोले, वर्ध्यातून माजी मंत्री प्रभा राव यांच्या कन्या चारूलता टोकस यांचा समावेश होतो. पण, यातल्या कुणालाही काँग्रेसचे २०१४ पासून बंद झालेले खाते विदर्भात सुरू करता आले नाही. ते श्रेय शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या आणि चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघातून भाजपचे केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना आव्हान देणाऱ्या सुरेश (बाळ्‌ू) धानोरकरांना द्यावे लागेल. 

शेजारील मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मिळवलेल्या यशाचा विदर्भातील काँग्रेसजनांना फायदा घेता आला नाही. ते अखेरपर्यंत आपसात भांडत राहिले, थोड्याफार चांगल्या कामगिरीची अपेक्षा असतानादेखील युतीला चांगले यश मिळाले. चंद्रपूरच्या काँग्रेसच्या तिकिटाबाबत सर्वाधिक सुंदोपसुंदी झाली. मात्र, तीच जागा काँग्रेसच्या पदरात पडताना दिसते आहे. वर्धा, यवतमाळ, रामटेक आणि गडचिरोली असे काही मतदारसंघ काँग्रेसच्या कलाचे दिसत होते. तेथेही त्या पक्षाचे पानिपत झाले आहे. 

भाजप आणि शिवसेनेने प्रत्येकी एक जागा विदर्भात गमावली तरीही शिवसेनेचे फार मोठे नुकसान झालेले नाही, हे लक्षणीय म्हणावे लागेल. मोदी लाटेत भाजपची मते शिवसेनेच्या उमेदवारांनाही मिळाली. त्यामुळेच चारपैकी ३ जागा टिकवण्यात शिवसेनेला यश मिळाले. राष्ट्रवादीला बुलडाणा आणि भंडारा- गोंदियातून अपेक्षा होती, ती धुळीला मिळाली. नवनीत राणांच्या रूपाने राष्ट्रवादी समर्थित उमेदवार निवडून आला एवढाच काय तो दिलासा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election Results Vidarbha Narendra Modi BJP Shivsena Congress Politics