रायगड लोकसभा मतदारसंघात 16 उमेदवार रिंगणात

अमित गवळे
सोमवार, 22 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यासाठी मंगळवारी (ता. 23) 32 रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणुक होत आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण 16 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. 2179 मतदानकेंद्रावर 15 हजार कर्मचार्‍यांसह प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे.

पाली (रायगड) : लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यासाठी मंगळवारी (ता. 23) 32 रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणुक होत आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण 16 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. 2179 मतदानकेंद्रावर 15 हजार कर्मचार्‍यांसह प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे.

मतदारसंघातील 16 लाख 51 हजार 560 मतदार त्यांचे भवितव्य ठरविणार आहेत. तर एकूण 35452 नवमतदार मताधिकार बजावणार आहेत. मतदारसंघातील प्रमुख लढत महायुतीचे उमेदवार अनंत गिते व पुरोगामी लोकशाही महाआघाडीचे उमेदवार सुनिल तटकरे या दोन तुल्यबळ नेत्यात होत आहे. पुढील दोन दिवस पोलीस आणि विविध पथकांना अतिशय काटेकोरपणे आणि काळजीपूर्वक तपासण्या करण्याचे निर्देश दिले असून कोणतेही बेकायदेशीर तसेच आचारसंहितेचा भंग करणारे कृत्य सहन करणार नाही, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

जिल्ह्यात १४४ कलम लावण्यात आले असल्याचेही ते म्हणाले. जास्तीत जास्त संख्येने मतदारांनी मतदान करावे व  एक सजग आणि सुजाण नागरिक म्हणून आपल्या जिल्ह्याचा गौरव वाढवावा असे आवाहनही त्यांनी  केले. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासंदर्भात जिल्हा पोलीस यंत्रणा देखील सज्ज झाली असून सर्वत्र आवश्यक व कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी दिली.

३२ रायगड मतदारसंघात १६ लाख ५१ हजार ५६० मतदार आहेत. यामध्ये पुरुष ८ लाख ९ हजार ३४४ आणि महिला ८ लाख ४२ हजार २१४आणि तृतीयपंथी ३ आहेत.  (मतदारसंघनिहाय:  पेण ३ लाख ७६ , अलिबाग २ लाख ९२ हजार ४२१, श्रीवर्धन २ लाख ५६ हजार १८०, महाड २ लाख ८४ हजार २३०, दापोली २ लाख ७९ हजार २३८, गुहागर २ लाख ३९ हजार ४१५ ) असे मतदार आहेत. याबरोबरच जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या मतदार नोंदणी मोहिमेस सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला होता. यावेळेस १८ ते १९ या वयोगटातील तरुण 35452 नवे मतदार मतदान करणार आहेत.

मतदारसंघात एकूण २१७९ मतदान केंद्रे आहेत. १९९६ ग्रामीण भागात तर १८३ शहरी भागात आहेत. मतदानकेंद्रावर 1 मतदान केंद्राध्यक्ष, 1 प्रथम मतदान अधिकारी, 2 इतर मतदान अधिकारी, असे एकूण 4 मतदान अधिकारी असतील. सर्व मतदान केंद्रासाठी 10 टक्के राखिव मतदान अधिकारी मिळून 1644 प्रथम मतदान अधिकारी, 3284 इतर मतदान अधिकारी असे 6572 अधिकारी व कर्मचारी असतील. यामध्ये 2625 महिला सहभागी आहेत. याशिवाय आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, व इतर मिळून सुमारे 15 हजार कर्मचारी तैनात करण्यात आली आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 16 candidates fights in Raigad Loksabha constituency