Loksabha 2019 : तिसऱ्या टप्प्यात 66 टक्के मतदान 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीच्या आज पार पडलेल्या तिसऱ्या टप्प्यात सायंकाळी सहापर्यंत 66 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आज पार पडलेल्या तिसऱ्या टप्प्यात सायंकाळी सहापर्यंत 66 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. पश्‍चिम बंगालमधील हिंसाचाराची घटना, केरळमध्ये तक्रारीनंतर इलेक्‍ट्रानिक मतदान यंत्र बदलावे लागण्याचा अपवाद वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. अत्यंत संवेदनशील अशा आणि तीन टप्प्यांत मतदान होणाऱ्या जम्मू- काश्‍मीरमधील अनंतनाग लोकसभा मतदारसंघासाठी आजच्या पहिल्या टप्प्यात अवघे 13 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रातील 14 जागांसाठी 56.57 टक्के मतदान झाले. ही अंतरिम आकडेवारी असून, यात बदल होऊ शकतो.
 
लोकसभा निवडणुकीच्या आजच्या तिसऱ्या टप्प्यात सर्वाधिक म्हणजे 13 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील 117 मतदार संघांमध्ये मतदान झाले असल्याने लोकसभेच्या एकूण 543 पैकी 303 मतदार संघांमधील मतदान पूर्ण झाले. निवडणूक आयोगाने सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन मतदानाची काही राज्यांमधील सायंकाळी पाचपर्यंतची, तर काही ठिकाणी सायंकाळी सहापर्यंतची अंतरिम आकडेवारी जाहीर केली. पहिल्या टप्प्यात 69.45 टक्के, तर दुसऱ्या टप्प्यात 69.43 टक्के मतदान झाले आहे. तर तिसऱ्या टप्प्यात 66 टक्के मतदान झाल्याचे आयोगाचे उपायुक्त उमेश सिन्हा यांनी सांगितले.

दुसऱ्या टप्प्यात कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यामुळे रद्द झालेल्या त्रिपुरामधील त्रिपुरा पूर्व या मतदार संघामध्येही आज मतदान पूर्ण झाले. जम्मू- काश्‍मीरच्या अनंतनाग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तीन टप्प्यांत होणार असून, आजच्या पहिल्या टप्प्यात अनंतनाग जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांत मतदान झाले. तर पुढील दोन टप्प्यांत या मतदारसंघात येणाऱ्या आणखी तीन जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होईल. केरळमधील तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील कोहलम येथील मतदान केंद्रामध्ये मतदान यंत्राविषयी तक्रार आल्यानंतर यंत्र बदलण्यात आले. बटण नादुरुस्त असल्यामुळे एका पक्षाला मतदान होत नसल्याची ही तक्रार होती. तर पश्‍चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बालिग्राम ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये मतदारसंघाबाहेरच एकाचा खून झाल्याची घटनाही घडली. 
उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने केंद्रीय निरीक्षक, भरारी पथके, व्हिडिओ चित्रीकरण पथकांसह मोठी यंत्रणा कामाला लावली असून, तिसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण होईपर्यंत रोख रक्कम 731 कोटी रुपये, 236 कोटी रुपयांचा मद्यसाठा, 1171 कोटी रुपयांचे अमली पदार्थ, तसेच 940 कोटी रुपयांचे सोने दागदागिने एकूण 3126 कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला असल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी या वेळी स्पष्ट केले. 

मतदानाची टक्केवारी 
छत्तीसगड - 7 जागा - 64.02 
कर्नाटक - 14 जागा - 60.42 
गोवा - 2 जागा - 70.19 
गुजरात - 26 जागा - 59 
दादरा नगर हवेली - 1 जागा - 71.43 
दीव दमण 1 जागा - 73 
केरळ - 20 जागा - 73.06 
आसाम - 4 जागा - 78.29 
प. बंगाल - 5 जागा - 78.97 
त्रिपुरा - 1 जागा - 79.64 
जम्मू काश्‍मीर (अनंतनाग) - 12.86 
बिहार - 5 जागा - 59.79 
महाराष्ट्र - 14 जागा - 56.57 
ओडिशा - 6 जागा - 64 
उत्तर प्रदेश - 10 जागा - 60.52 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 66 percent voteing In third phase of Loksabha Election