Loksabha 2019 : देशभरात ६६ टक्के मतदान

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात १२ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ९७ जागांसाठी काल ६६ टक्के मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र मतदान शांततेत आणि उत्साहात पार पडले.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात १२ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ९७ जागांसाठी काल ६६ टक्के मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र मतदान शांततेत आणि उत्साहात पार पडले. महाराष्ट्रातील दहा जागांसाठी ६३ टक्के मतदान झाले.

पुद्दुचेरीमध्ये सर्वाधिक ७८ टक्के, तर जम्मू- काश्‍मीरमध्ये सर्वांत कमी ४३.४ टक्के मतदान झाले. श्रीनगर मतदारसंघात अवघ्या १४.८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्रिपुरामधील एका जागेसाठीचे मतदान काल थांबविण्यात आले. आता २३ एप्रिलला तेथे मतदान होईल. 

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरातील १६२९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद झाले आहे. तमिळनाडूमध्ये सर्वाधिक ८४५ उमेदवार होते, तर त्याखालोखाल कर्नाटक (२४१) आणि महाराष्ट्रात (१७९) उमेदवार होते. मतदान पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मतदानाविषयी माहिती दिली. अर्थात, ही आकडेवारी प्राथमिक म्हणजे सायंकाळी सहापर्यंतची असून त्यात  वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. काल देशभरात दुसऱ्या टप्प्यात ६६ टक्के मतदान झाले. २०१४ मध्ये हे प्रमाण ६९.६२ टक्के होते. त्रिपुरा, पश्‍चिम बंगाल, मणिपूरमध्ये किरकोळ हिंसाचार, मतदान यंत्र बंद पडण्याच्या घटना आढळून आल्या. जम्मू- काश्‍मीरमध्ये शांततेत मतदान झाल्याचे या वेळी आवर्जून नमूद करण्यात आले. 

आसाममधील ५ जागांसाठी, बिहारमधील ५ जागांसाठी, छत्तीसगडमधील ३ जागांसाठी, कर्नाटकमधील १४ जागांसाठी, महाराष्ट्रातील १० जागांसाठी, मणिपूरमधील एका जागेसाठी, ओडिशातील ५ जागांसाठी, पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील एका जागेसाठी, तमिळनाडूतील सर्व ३९ मतदारसंघांसाठी, उत्तर प्रदेशातील ८ जागांसाठी, तर पश्‍चिम बंगालमधील ३ जागांसाठी मतदान झाले. जम्मू- काश्‍मीरमधील श्रीनगर आणि उधमपूर या दोन जागांसाठीही काल मतदान झाले. मात्र, श्रीनगरमध्ये २०१४ च्या निवडणुकीत २५.५६ टक्के मतदान झाले होते. यावेळची टक्केवारी मात्र अवघी १४.८ टक्के आहे. उधमपूरमध्ये ६६.६७ टक्के मतदान झाले. गेल्या वेळी ते ७१.४८ टक्के होते.

मतदानाचे फोटो व्हायरल केले
परभणी, उस्मानाबाद ः ‘हे घ्या... तुम्हालाच केले मतदान...’ अशा पद्धतीच्या पोस्ट  परभणीत सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. या प्रकाराची जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी गंभीर दखल घेतली आणि त्यांनी कारवाईचे आदेश दिले. दरम्यान, उस्मानाबादेत मतदान करतानाचे फोटो काढून ते सोशलमिडीयावर प्रसारीत करुन गोपनियतेचा भंग केल्याप्रकरणी शहरातील दहा, जिल्ह्यातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

शून्य टक्के मतदान
श्रीनगर लोकसभा मतदारसंघातील ९० मतदान केंद्रांवर शून्य टक्के मतदान झाले. या मतदारसंघात आठ विधानसभा मतदारसंघांतील ५० मतदान केंद्रांवर शून्य टक्के मतदान झाले. त्यात इदगाह, खन्यारस हब्बा कदाल आणि बटमालूतील बहुसंख्य केंद्रांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला व उमर अब्दुल्ला यांनी मतदान केलेल्या सोनावार केंद्राचा (१२ टक्के) अपवाद वगळता, अन्य केंद्रांवरहील मतदानाची टक्केवारी एक आकडी होती. 

सोशल मीडियावर लक्ष
निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात (१२ ते १८ एप्रिल या कालावधीत) सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर हटवला. यात फेसबुकवरील २५ पोस्ट हटविल्या. ट्विटर ३८, यूट्यूब आणि व्हॉट्‌सॲप प्रत्येकी दोन पोस्ट हटविल्या. 

वोटर टर्नआउट ॲप
दरम्यान, मतदानाची टक्केवारी तत्काळ उपलब्ध व्हावी यासाठी ‘वोटर टर्नआउट’ हे ॲप निवडणूक आयोगाने तयार केले असून, याद्वारे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील मतदानाची अद्ययावत माहिती मिळू शकते. आयोगाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना यासाठी तपशील देता यावा यासाठी सुविधा ॲपही तयार केले आहे. आजची टक्केवारी प्राथमिक स्वरूपाची आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 66 percent voting in loksabha election 2019 phase 2