Loksabha 2019 : जाहिरातबाजीसाठी मोदींकडून साडेचार हजार कोटींचा खर्च : राज ठाकरे

वृत्तसंस्था
बुधवार, 17 एप्रिल 2019

- 14 हजार शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या

- मोदी-शहा देश संपविणार

सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या नवाझ शरीफ यांच्यासोबत जेवतात, त्यांना केक भरवायला का गेले? मोदींचे शरीफांबाबतचे फोटो पाहून जवानांना काय वाटले असेल?, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच पंतप्रधान मोदींनी योजनांच्या जाहिरातबाजी केली. त्यासाठी साडेचार हजार कोटी रुपयांचा खर्च केला गेला, असेही राज ठाकरे म्हणाले. 

सातारा येथे आयोजित जाहीरसभेत राज ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईकची कारवाई केल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणाले होते, की 250 लोक मारली गेली. असे असले तर त्यांना हे समजलं कसं?  त्यानंतर हवाई दलप्रमुखांनीही पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये त्यांनी सांगितले होते, की आम्हाला काही कळतं नाही. आमच्याकडे आकडेवारी नसते. पण ही कारवाई झाली. 

तसेच भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे 250 लोक मारले गेले असते तर अभिनंदन वर्धमान यांना भारतात सोडले नसते. जर त्यांना सोडले असते तर तेथील लोकांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना जिवंत जाळले असते.

दरम्यान, देशाला माझे आवाहन आहे, की आता बेसावध होऊ नका. उद्या जर ही लोकं आली तर तुम्हाला गुलाम म्हणून वागणूक देतील. ही परिस्थिती उद्भवू नये, यासाठी त्यांना मत देऊ नका, असेही राज ठाकरे म्हणाले.

14 हजार शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या

गेल्या पाच वर्षांत 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. देशात बलात्कार, बेरोजगारी कमी झाली नाही. तरुणांना रोजगार मिळत नाहीये. पण पंतप्रधान मोदी एक शब्दही काढायला तयार नाही. ही लोकं किती भंकप आहेत, हे आता सर्वांना समजत आहे.

मोदी-शहा देश संपविणार

नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघे देश संपविणार आहेत. त्यांचे वर्तन अॅडॉल्फ हिटरलसारखं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For Advertisement Modi Expenses Four and Half Thousand Crores says Raj Thackeray