Loksabha 2019 : दहशतवाद्यांच्या मृत्यूचे महाआघाडीतील नेत्यांना दु:ख : अमित शहा

पीटीआय
गुरुवार, 25 एप्रिल 2019

देशात 55 वर्षे कॉंग्रेसचे सरकार होते. 15 वर्षे बिहारमध्ये लालू-राबडीदेवी यांचे जंगलराज होते. या काळात बिहारसाठी काय केले? जेव्हा जेव्हा जंगलराजची आठवण होते, तेव्हा बिहारची जनता भयभीत होते. 

- अमित शहा, भाजप अध्यक्ष 

मुंगेर : बालाकोटच्या हवाई हल्ल्यानंतर दोन ठिकाणी शोक पाळण्यात आला. एक पाकिस्तानात, तेथे शोक होणारच, दुसरे म्हणजे राहुल बाबा अँड कंपनींच्या महाआघाडींत, अशी टीका आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली. दहशतवाद्यांना मारल्याबद्दल या नेत्यांना दु:ख झाले, असे शहा म्हणाले. बिहारच्या मुंगेर येथे आयोजित प्रचारसभेत अमित शहा यांनी राजदवर जोरदार हल्लाबोल केला.

जेडीयूचे उमेदवार ललनसिंह यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना शहा म्हणाले, एनडीए सरकारने बिहारला गुंडागर्दी, भ्रष्टाचार, लूटमारीवर आधारलेल्या राजदच्या जंगलराजमधून बाहेर काढले आणि पुढील पाच वर्ष बिहारला संपूर्णपणे विकसित राज्य करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. बालाकोटच्या कारवाईनंतर कॉंग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर शहा यांनी टीका केली.

ते म्हणाले, तिकडे पाकिस्तानात दहशतवादी मारले गेले आणि इकडे नेतेमंडळीचे चेहरे पडले. ते काय तुमचे नातलग होते का? बिहारची जनता गुंडाराज, भ्रष्टाचार, लूटमारमध्ये अडकली होती आणि राजद सरकारमुळे राज्य विकासापासून वंचित राहिले होते. आपल्याला जंगलराज आठवते का? पण नीतीशकुमार आणि सुशील मोदी यांचे सरकार आल्यानंतर बिहारच्या जनतेने मोकळेपणाचा श्‍वास घेतला. बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे आणि विकास करण्याचे काम एनडीएने केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah criticizes congress and Alliance over Terror Attack Issue