Loksabha 2019 : अमरावतीत अद्यापही 'माहौल' नाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

विदर्भात पहिल्या टप्प्यात सात लोकसभा मतदारसंघांत मतदान आटोपले. दुसऱ्या टप्प्यात अकोला, बुलडाण्यासह अमरावतीमध्ये येत्या 18 एप्रिलला मतदान होणार आहे.

नागपूर : विदर्भात पहिल्या टप्प्यात सात लोकसभा मतदारसंघांत मतदान आटोपले. दुसऱ्या टप्प्यात अकोला, बुलडाण्यासह अमरावतीमध्ये येत्या 18 एप्रिलला मतदान होणार आहे. प्रचार तोफा थंडावण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. पण, अद्यापही निवडणुकीचा पाहिजे तसा "माहौल' तयार झाला नाही, अशी चर्चा जनमानसात होत आहे आणि तसेच चित्रही आहे. 

अमरावतीसह पश्‍चिम विदर्भात नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी यांची एकही सभा झाली नाही. अमरावतीमध्ये आतापर्यंत राजनाथसिंह, शिवराजसिंह चौहान, असदुद्दीन ओवेसी, प्रकाश आंबेडकर यांच्या सभांसह उद्धव ठाकरे यांचा एक कार्यकर्ता मेळावा झाला. पण, आजवर झालेल्या या सभांमुळे निवडणुकीची पाहिजे तशी वातावरणनिर्मिती झाली नसल्याचे चित्र आहे. याशिवाय 16 एप्रिलला उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. महाआघाडी आणि महायुतीच्या राष्ट्रीय नेत्याची अद्याप एकही सभा न झाल्याने कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये उत्साह नसल्याचे सांगण्यात येते.

आज सायंकाळी आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारार्थ परतवाडा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. ही राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आजच्या या सभेनंतर किमान परतवाड्यात तरी वातावरणनिर्मिती झाल्याचे दिसतेय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amravati still has no atmosphere of election