Election Results : अखेर गोपाळ शेट्टींचे काम बोलले; उर्मिला प्रभाव नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

तीव्र मोदी लाटेचा प्रभाव आणि झगमगत्या चंदेरी दुनियाच्या कृत्रिम प्रकाशापेक्षा गोपाळ शेट्टी यांचे प्रत्यक्ष कामाचे तेज प्रभावी ठरल्याचे उत्तर मुंबईत दिसून येत आहे.

तीव्र मोदी लाटेचा प्रभाव आणि झगमगत्या चंदेरी दुनियाच्या कृत्रिम प्रकाशापेक्षा गोपाळ शेट्टी यांचे प्रत्यक्ष कामाचे तेज प्रभावी ठरल्याचे उत्तर मुंबईत दिसून येत आहे. मतदानाच्या दिवशीच काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांचा विजय अवघड असल्याचे चित्र दिसत होते. दुपारी 12 वाजेपर्यंत शेट्टी यांनी एक लाख मतांची आघाडी घेतली होती. गोपाळ शेट्टी यांनी गेली 15 ते 20 वर्षे नगरसेवक असल्यापासून लोकांची कामे तळमळीने केली आहेत. गेल्या पाच वर्षांत तर त्यांनी मतदार संघाबाहेर जाऊन तेथील प्रश्‍न सोडवले होते. त्याचा फायदा शेट्टी यांना मिळाला. 

मतदानाच्या दिवशी मालाड कांदिवली बोरीवली येथील गुजराती बहुल विभागात लागलेल्या मतदारांच्या मोठ्या रांगा पाहूनच भाजपच्या संभाव्य विजयाचा अंदाज आला होता. शेट्टी यांना मराठी मतदारांचे सर्व भाषिक मतदारांची पसंती मिळाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा फॅक्‍टरही येथे चालला नाही. मनसे कार्यकर्त्यांनी मातोंडकर यांचा प्रचार करुनही त्यांना फारसा फायदा झाला नाही. यांना काही प्रमाणात तरुणांची मतं मिळाली. त्या अभिनेत्री असल्याने प्रचारादरम्यान लोकांमध्ये आकर्षण होते. मात्र, 2004 मध्ये उत्तर मुंबईच्या मतदारांनी अशाच प्रकारे अभिनेत्याच्या मागे जाऊन आपले होत पोळून घेतले होते. त्यावेळी मतदारांनी अनुभवी राम नाईक यांच्या तुलनेत अभिनेता गोविंदाला पसंती दिली होती. मात्र,गोविंदा संसदेत तसेच बाहेरदेखील पारसा प्रभाग पाडू शकला नाही. त्या अनुभवातून शहाणे होत मतदारांनी या वेळी ती चूक सुधारली होती. 

वंचित बहुजन आघाडी आणि समाजवादी पक्ष तसेच अन्य उमेदवारांचीही येथे फारशी डाळ शिजली नाही. 2014 मध्ये शेट्टी यांना देशातील सर्वांत मोठी आघाडी होती. ते चार लाखांहून अधिक मतांनी निवडून आले होते. ही चार लाखांहून अधिक मतांची आघाडी तोडणं हेच आव्हान होतं. शेट्टी यांना मिळालेले मताधिक्‍य पाहाता सेनाभाजप युती येत्या विधानसभा निवडणुकीतही पूर्वीच्याच कामगिरीची पुनरावृत्ती करेल, अशी शक्‍यता आहे. 

शेट्टी यांचे शिवसेनेशी असलेले सलोख्याचे संबंधही त्यांच्या कामी आली. शिवसेना आणि भाजपने एकत्रित येऊन या मतदार संघात काम केले. तर, दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे स्थानिक पदाधिकाऱ्यांना मेहनत घेतली नाही. शेट्टी यांचा स्वत:चा जनसंपर्क दांडगा असून त्याचाही फायदा त्यांना झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article on North Mumbai Political Situation Loksabha 2019