Loksabha 2019 : बनावट मतदानासाठी भाजप उमेदवाराची फूस

वृत्तसंस्था
रविवार, 21 एप्रिल 2019

बनावट मतदान करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करण्याची फूस देणारा भाजपच्या उमेदवाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

बदायूँ (उत्तर प्रदेश) : बनावट मतदान करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करण्याची फूस देणारा भाजपच्या उमेदवाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मतदानाच्या दिवशी उपस्थित नसणाऱ्यांच्या नावाने बनावट मतदान करावे, असे आवाहन बदायूँच्या भाजप उमेदवार संघमित्रा मौर्य करताना या व्हिडिओमध्ये दिसते. 

"एकही मत वाया जाऊ देऊ नका आणि मतदानाला कोणी नसेल, तर बनावट मतदान करणे, ही सर्वसामान्य बाब आहे. तुम्हाला संधी मिळाली, तर तिचा फायदा घ्या. शक्‍यतो खऱ्या मतदारांना मतदानाला आणण्याचा प्रयत्न करा; पण तसे जमले नाही, तर छुप्या पद्धतीने काही तरी करावे लागेल,' असे संघमित्रा कार्यकर्त्यांना सांगताना दिसतात. यासंदर्भात विचारणा केली असता, मला या प्रकाराची माहिती नाही; पण चौकशी केली जाईल, असे जिल्हा न्याय दंडाधिकारी दिनेशकुमार सिंह यांनी सांगितले.

संघमित्रा या उत्तर प्रदेशचे मंत्री स्वामीप्रसाद मौर्य यांच्या कन्या असून, बदायूँमध्ये 23 एप्रिलला मतदान होईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP candidate Involving for Fake Voting