Loksabha 2019 : माढ्यात भाजपच्या रणजितसिंहांना मतदान करतानाचा व्हिडीओ व्हायरल

मनोज गायकवाड
Tuesday, 23 April 2019

माढा लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना मतदान केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली.

अकलूज : माढा लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना मतदान केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. एका पोलींग एजंटने हा व्हिडीओ चित्रीत व प्रसारीत केल्याची चर्चा आहे. त्यामुळे माढ्यात नेमके चाललेय काय असा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी माळशिरस तालुक्यात दुपारी तीन वाजेपर्यंत साधारणतः 45 टक्के मतदान झाले असून, तालुक्यातील 1 लाख 44 हजार 427 मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला. 

या मतदारसंघातून 31 उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी, खरी लढत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच दिसून येत आहे. मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाईल वापराला बंदी असली तरी, माळशिरस तालुक्यात मात्र निवडणूक आयोगाच्या या नियमाला हरताळ फासला आहे. मतदान केंद्रांमध्ये सर्रासपणे मोबाईलचा वापर आणि गैरवापर होत असल्याचे दिसत आहे. भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना मतदान केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  विशेष म्हणजे एका पोलींग एजन्टनेच तो व्हायरल केल्याची चर्चा आहे. त्यामुळे माढ्यातील मतदान प्रक्रिया संशयाच्या गर्तेत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, रिपाई, रासप आदी विविध पक्षाचे नेते व कार्यकर्ते सकाळपासूनच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. तालुक्यात 3 लाख 19  हजार 641 एवढी मतदारसंख्या आहे. त्यासाठी 272 ठिकाणी 338 मतदान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यातील 34 मतदान केंद्रे संवेदनशील घोषित केली आहेत. यंदा प्रथमच अकलूज परिसरातील मतदान केंद्रांवर (सीसीटीव्ही) कॅमेऱ्यांची नजर ठेवण्यात आली आहे. 

खासदार विजयसिंह मोहिते पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आज सकाळी आपल्या कुटुंबासोबत मतदान केले. भाजपचे मताधिक्य वाढविण्यासाठी मोहिते-पाटील परिवारातील प्रत्येक व्यक्ती आज घराबाहेर पडली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मोहिते पाटील बारीक लक्ष ठेवून आहेत. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, धैर्यशिल मोहिते-पाटील, शिवतेजसिंह मोहिते-पाटील प्रत्येक मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करीत आहेत.

भाजपमधील पुर्वाश्रमीच्या नेत्यांनीदेखील आपली यंत्रणा सतर्क ठेवली आहे. आघाडीच्या उमेदवाराचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, हिंदुराव माने पाटील, पांडुरंगराव देशमुख, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार रामहरी रुपनवर, डॉ रामदास देशमुख आदी मंडळी प्रयत्न करीत आहेत. तर वंचित आघाडीच्या उमेदवारासाठी दलीत व मुस्लिम समाजातील तरुण निकराने प्रयत्न करताना दिसत आहेत. या निवडणुकीत 31 उमेदवार आपले नशीब अजमावत असले तरी युती, आघाडी आणि वंचित आघाडी सोडून अन्य उमेदवारांची कसलीही चर्चा दिसत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP candidate From Madha Ranjitsinghs voting video goes viral