Loksabha 2019 : अब की बार.. 282 पार : भाजपचा आत्मविश्वास!

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 मे 2019

- सर्जिकल स्ट्राईकबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशिवाय कोणीही बोलत नाही

नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय होईल आणि 282 हून अधिक जागा पक्षाला मिळतील, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला. तसेच आता एनडीएच्या विजयी उमेदवारांची संख्याही वाढेल, असेही ते म्हणाले.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, मागील निवडणुकीपेक्षा 2019 च्या निवडणुकीत भाजपचा जास्त जागांवर विजय होईल. फक्त आम्हीच नाहीतर एनडीएतील घटक पक्षांच्या जागाही वाढणार आहेत. तसेच भाजपला जनता का मत देईल, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आल्याने अमित शहा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देशातील जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे आता आम्हाला असे वाटते, की त्यांच्या नेतृत्त्वाखाली पुन्हा एकदा नवे सरकार सत्तेवर येईल. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कार्यकाळात सर्व बाबी लक्षात घेऊन विकासाच्या दृष्टीने पावले उचलली.

दरम्यान, काँग्रेसकडून सहा सर्जिकल स्ट्राईकची कारवाई केली गेली असा दावा केला गेला. त्यावर अमित शहा म्हणाले, काँग्रेसच्या कार्यकाळात सर्जिकल स्ट्राईकची कारवाई केली, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशिवाय अन्य कोणीही बोलत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP will breach 282 mark by large margin says Amit Shah