Loksabha 2019 : बुलेट इतिहासजमा; आता फक्‍त बॅलेट

श्रीमंत माने
शनिवार, 11 मे 2019

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात पश्‍चिम बंगालमधील आठ मतदारसंघांपैकी निम्म्या चार जागांवर कित्येक दशकांनंतर बुलेटऐवजी निर्भय वातावरणात "बॅलेट'चा वापर होईल.

कोलकता : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात पश्‍चिम बंगालमधील आठ मतदारसंघांपैकी निम्म्या चार जागांवर कित्येक दशकांनंतर बुलेटऐवजी निर्भय वातावरणात "बॅलेट'चा वापर होईल. कधी काळी माओवाद्यांचा गड असलेल्या, घनदाट जंगलांमधील रक्‍तपातासाठी ओळखल्या जाणाऱ्या बांकुरा, पुरुलिया, मिदनापूर आणि झारग्राम या बहुचर्चित जंगलमहलमधील मतदार 12 मे रोजी मतदानासाठी बाहेर पडतील तेव्हा तेथील भयमुक्‍तीच्या जंगलमहल मॉडेलला पुन्हा उजाळा मिळेल. 

जवळपास साडेसात वर्षांत जंगलमहलमध्ये रक्‍तपाताची एकही घटना घडलेली नाही. या परिवर्तनाचे श्रेय ममता बॅनर्जींना जाते. 2011 मध्ये सत्तेवर येताच त्यांनी येथील गरिबांच्या भुकेची वेदना ओळखली. त्यापूर्वी रोजच्या रक्‍तरंजित घटना अन्‌ भीतीच्या वातावरणामुळे सगळ्यांचे लक्ष असायचे ते सुरक्षेवर. भयमुक्‍तता सगळ्यांनाच हवी होती. पण, भूकमुक्‍तीकडे लक्ष नव्हते. दुर्गम भागात खेड्यापाड्यांत रेशन दुकाने एकतर नव्हती किंवा असली तरी माओवादी ती उघडू देत नसायचे. तेव्हा गरिबांना दोन रुपये किलोने तांदूळ विकण्यासाठी किंवा वाटण्यासाठी ममतांनी चक्क पोलिस ठाणी निवडली.

एकीकडे माओवाद्यांची, तर दुसरीकडे पोलिसांची भीती वाटणाऱ्या आदिवासींसाठी त्यामुळे एक दिशा तरी सुरक्षित बनली. पोलिसांनी खबऱ्यांचे जाळे नव्याने विणले. खरेतर ते वापरण्याची फारशी गरज भासली नाही. कारण, कॉंग्रेससोबत आघाडी करून तृणमूल सत्तेवर आल्यानंतर काही महिन्यांमध्येच 24 नोव्हेंबर 2011 रोजी माओवाद्यांचा नेता एम. कोटेश्‍वर राव ऊर्फ किशनजी चकमकीत मारला गेला. माओवाद्यांना नेता उरला नाही. शेकडोंना शरणागतीस प्रवृत्त केले. त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली. महिलांची विशेष काळजी घेतली. आरोग्याकडे लक्ष दिले. मुलांना मोफत शिक्षण, क्रीडांगणासाठी विशेष योजना राबविल्या.

हा भाग 2010 मध्ये देशातील सर्वाधिक अशांत टापू होता. देशभरातील माओवाद्यांच्या हिंसाचाराच्या 1080 पैकी 425 घटना केवळ जंगलमहलमधल्या होत्या. 2011 मध्ये अशा केवळ सहाच घटना घडल्या, त्याही किशनजी मारण्याआधी. जागतिक बॅंकेच्या अहवालात शांतता प्रस्थापित होण्यामुळे स्थिरावणाऱ्या लोकजीवनाच्या अनुषंगाने या मॉडेलची दखल घेण्यात आली. 

हो, त्याच त्या भारती घोष... 

पश्‍चिम बंगाल पोलिसांनी गुरुवारी (ता. 9 मे) रात्री घाटाल मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार, माजी पोलिस अधिकारी भारती घोष यांना त्यांच्या गाडीत एक लाख 30 हजार रुपये सापडल्यामुळे ताब्यात घेतले. निवृत्ती घेऊन निवडणुकीत उतरलेल्या त्या आयपीएस अधिकारी आहेत. राष्ट्रसंघाच्या शांतिसेनेच्या माध्यमातून कोसोवो व बोस्नियात काम करून परतल्यानंतर त्या जंगलमहल भागात सहा वर्षे पश्‍चिम मिदनापूरच्या पोलिस अधीक्षक होत्या.

कोब्रा बटालियनशी चकमकीत किशनजी मारला गेला तेव्हा घोष यांची भूमिका महत्त्वाची होती. त्या दोन वर्षांपूर्वीपर्यंत ममतांच्या प्रशासनातील मानसकन्या मानल्या जायच्या. ममतादीदी त्यांना "भालो मेये' म्हणजे "चांगली मुलगी', तर घोष दीदींना "जंगलमहलच्या मॉं' म्हणायच्या. मुकुल रॉय भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्याशी जवळिकीच्या संशयावरून दीदींची घोष यांच्यावर खप्पा मर्जी झाली. नोकरी सोडल्यानंतर खंडणीवसुलीचे गुन्हे दाखल झाले. त्या बरेच दिवस फरार होत्या. नंतर घोष यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bullet history Now only ballet for Election