Loksabha 2019 : कुणबी समाज काँग्रेसच्या पाठीशी : टावरे

सुरेश टावरे
बुधवार, 17 एप्रिल 2019

- कुणबी सेनेचे नेते विश्वनाथ पाटील काँग्रेस सोडून विरोधकांना मिळाले

वाडा : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कुणबी समाज हा कायम काँग्रेस विचारधारेशी जोडलेला आहे. स्वार्थासाठी कुणबी सेनेचे नेते विश्वनाथ पाटील हे काँग्रेस सोडून विरोधकांना मिळाले असले तरी हा समाज आपल्या पाठीशी आहे, असे काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांनी वाडा येथे झालेल्या सभेत काढले. 

काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, बहुजन विकास आघाडी, रिपाइं (कवाडे गट)आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या प्रचारार्थ येथील पटारे मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 

आपण विद्यमान खासदार असताना पक्षाने उमेदवारी नाकारून विश्वनाथ पाटलांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी आपण पक्षांच्या आदेशाप्रमाणे काम केले. मी कुठेही नाराजी व्यक्त केली नाही. या निवडणुकीत मात्र पक्षाने आपली उमेदवारी जाहीर केल्याने विश्वनाथ पाटील नाराज झाले व थेट ज्यांच्याकडून पराभव स्वीकारला त्यांच्या गोटात सामील झाले हे दुदैर्वी आहे.

केवळ स्वार्थासाठी विश्वनाथ पाटील भाजपसोबत गेल्याने कुणबी समाजातच प्रचंड नाराजी असून हा समाज या निवडणुकीत आपल्याच सोबत राहील असा विश्वास टावरे यांनी यावेळी व्यक्त केला.

तसेच ते पुढे म्हणाले, की विद्यमान खासदार आणि आपल्या कार्यपध्दतीत जमिन अस्मानाचा फरक आहे. माझे कुठलेही जेसीबी डंपर नाही अथवा मी ठेकेदारी करीत नाही. त्यामुळे सामान्य जनतेला आपल्या कार्यालयाचे दरवाजे कायम खुले राहतात असे म्हणत त्यांनी खासदार कपिल पाटील यांचे नाव न घेता त्यांच्या व्यावसायिक हितसंबंधावर टीका केली.

आदिवासी विकास महामंडळाने 394 कर्मचा-यांची भरती केली असून त्यामध्ये पालघर व ठाणे जिल्ह्यातील एकही उमेदवाराला संधी दिली गेली नाही. या भरती प्रकियेत 150 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनिल भुसारा यांनी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्यावर केला. त्याचप्रमाणे भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर गोरगरिबांना खावटी कर्ज वाटले नाही. मात्र त्यांच्या नावावर 361 कोटी कर्ज माफ केल्याचे दाखवून मोठा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप आदिवासी विकास विभागावर करत हे सरकार सर्वसामान्य जनतेला फसवणारे सरकार असल्याची टीका भुसारा यांनी केली. 

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केदार काळे यांनी काॅग्रेस पक्ष सामान्य जनतेच्या हितासाठी काम करतोय. या निवडणुकीद्वारे गरीबांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, या हेतूने 72 हजार रुपये मदत देणारी न्याय योजना राबवून ख-या अर्थाने सामान्य जनतेचे हित साधले जाणार असल्याचे ते म्हणाले. नोटा बदलण्यासाठी रांगा लावून छळणा-या सरकारला मतदानासाठी रांगा लावून धडा शिकवा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनिष गणोरे यांनी केले. 

यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रेखा पष्टे, जिल्हा बॅकेचे संचालक निलेश भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस हरिभाऊ पाटील, वाडा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा भारती सपाटे, मनसेचे कांतीकुमार ठाकरे, शेकापचे सचिन मुकणे, बविआचे अनंता भोईर, काॅग्रेसचे वाडा तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, पांडुरंग पटारे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Community of Kunabi Peoples are Supporting to Congress says Taware