Loksabha 2019 : काँग्रेसला पाकपुरस्कृत दहशतवाद रोखता आला नाही : अमित शहा

पीटीआय
Sunday, 28 April 2019

ओडिशाच्या विकासासाठी भ्रष्टाचारी आणि अकार्यक्षम बीजेडी सरकारला पराभूत करणे गरजेचे आहे, असे मत आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केले.

मोरादा (ओडिशा) : ओडिशाच्या विकासासाठी भ्रष्टाचारी आणि अकार्यक्षम बीजेडी सरकारला पराभूत करणे गरजेचे आहे, असे मत आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केले. आदिवासीबहुल मयूरभंज लोकसभा मतदारसंघात आज प्रचारसभेनिमित्त बोलताना शहा यांनी, देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याचा निर्धार केल्याचे सांगितले. तत्कालीन यूपीए सरकारने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला थांबवला नाही, असाही आरोप शहांनी केला. 

शहा म्हणाले, पूर्वेपासून पश्‍चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे सध्या एकच आवाज ऐकू येत आहे, तो म्हणजे मोदी, मोदी. आतापर्यंत मी 261 लोकसभा मतदारसंघात सभा घेतल्या आहेत. जनतेने मोदींनाच कौल देण्याचे निश्‍चित केले असल्याचा दावा शहा यांनी केला. ओडिशातील भाजपची वाढती लोकप्रियता पाहून बीजेडीची झोप उडाली आहे. ओडिशाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात आणि केंद्रात भाजपला निवडून द्या, असे आवाहन अमित शहा यांनी केले. शहा यांनी तत्कालीन यूपीए सरकारवर टीका केली. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद थांबविण्यास कॉंग्रेस आघाडी सरकार अपयशी ठरल्याचे ते म्हणाले. ओडिशात 29 एप्रिल रोजी विधानसभा आणि लोकसभेसाठी मतदान होणार आहे. 

जम्मू काश्‍मीरचे 370 कलम वगळणार 

केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाल्यास जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम काढून टाकणार, असे आश्‍वासन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणाले. झारखंडच्या पलामू जिल्ह्यात भाजप आघाडी उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अमित शहा बोलत होते. राष्ट्रीय सुरक्षेविषयी कदापि तडजोड केली जाणार नाही. पाकिस्तान काश्‍मीरला भारतापासून वेगळे करण्याचा डाव रचत आहे. परंतु, भाजप सरकार पाकिस्तानचे मनसुबे कदापि यशस्वी होऊ देणार नाही. महागठबंधन करणाऱ्या नेत्यांचा उद्देश हा केवळ भ्रष्टाचार करणे आहे.

झारखंडमध्ये एका अपक्ष आमदाराला मुख्यमंत्रीपदी बसवून अब्जावधीचा भ्रष्टाचार केला. कॉंग्रसने गरीब जनतेचा पैसा खाल्ला, असा आरोप शहा यांनी केला. ज्या वेळी बालाकोटमध्ये हवाई हल्ले झाले तेव्हा देशभरात उत्सवाचे वातावरण होते. सर्वत्र पेढे वाटले गेले. मात्र दोन ठिकाणी शोककळा पसरली होती. पहिली म्हणजे पाकिस्तानात आणि महागठबंधनच्या नेत्यांवर. त्यांचे चेहरे पडले होते, अशी टीका शहांनी केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Cannot Control Terrorism says Amit Shah