Loksabha 2019 : वाराणसीतून मोदींविरुद्ध प्रियांका गांधी? 

Priyanka Gandhi, Narendra Modi
Priyanka Gandhi, Narendra Modi

भाजपचा गड असलेल्या वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी निवडणुकीच्या मैदानात उतरणार का, याबाबत उत्तरप्रदेशात मोठ्या उत्सुकतेने चर्चा सुरू झाली आहे. मोदी निवडून येणार असले, तरी गांधी यांच्या प्रचारामुळे उत्तर भारतातील निवडणूक प्रचाराचे वातावरण ढवळून निघेल. 

रायबरेली येथे त्या मार्चच्या अखेरीला प्रचाराला गेल्या होत्या, तेव्हा तुम्ही रायबरेलीतून निवडणूक लढविणार का, अशी विचारणा कार्यकर्त्यांनी, तसेच पत्रकारांनी केली, तेव्हा प्रियांका यांनी प्रतिप्रश्‍न केला, "वाराणसीतून का नको.'' तेव्हापासून मोदी यांच्यासमोर त्या उभ्या ठाकणार असल्याची चर्चा सुरू झाली. अद्यापही काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने वाराणसी आणि अलाहाबाद येथून उमेदवार जाहीर केलेले नाहीत. 
गांधी यांना सप-बसप महागठबंधनसह सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला, तर त्या वाराणसीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. काँग्रेसमध्येही त्याबाबत गांभीर्याने चर्चा सुरू आहे. पक्षाचे प्रवक्ते मात्र या प्रश्‍नावर काहीही बोलण्यास तयार नाहीत. 

प्रियांका वाराणसीमध्ये प्रचाराला उतरल्या, तर देशातील सर्वांधिक चर्चेचा मतदारसंघ वाराणसी ठरेल. गांधी ज्या पद्धतीने मोदी यांच्या सरकारवर हल्ला करीत आहेत, त्याचे पडसाद उत्तर भारतातील निवडणुकीच्या प्रचारातही उमटतील. निवडणुकीच्या शेवटच्या तीन टप्प्यात या भागातील अनेक राज्यांत मतदान होणार आहे. 

भाजपलाही त्यांची प्रचाराची रणनिती बदलावी लागेल. मोदी 25 व 26 एप्रिलला वाराणसीत जाणार आहेत. 25 रोजी त्यांची प्रचारफेरी निघणार आहे, तर 26 एप्रिलला ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत. वाराणसीत 19 मे रोजी मतदान आहे. देशातील निवडणुकीच्या शेवटच्या टप्पा त्या दिवशी असल्यामुळे, दोन्ही पक्षाच्या नेत्यांना तेथे प्रचारासाठी पोहोचता येईल. मोदी यांच्याविरुद्ध गेल्या वेळी आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक लढविली होती. त्यावेळी झालेल्या मतदानापैकी 56 टक्के मते मोदी यांना मिळाली होती. 1991 पासून एका निवडणुकीचा अपवाद वगळता, वाराणसीतून भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र, गांधी विरोधात उतरल्या, तर चांगल्या मताधिक्‍याने निवडून येण्यासाठी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना वाराणसीत तळ ठोकून बसावे लागेल. 

लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रियांका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे पूर्व उत्तरप्रदेशची जबाबदारी सोपविली. गेल्या तीन दशकात विशेषतः राम मंदीराविषयीच्या आंदोलनानंतर उत्तर प्रदेशातील काँग्रेसची ताकद दिवसेंदिवस घटत गेली. भाजप, मुलायमसिंग यादवांचा समाजवादी पक्ष आणि मायावतींचा बहुजन समाज पक्ष यांनी देशातील हे सर्वांत मोठे राज्य व्यापून टाकले. भाजपचे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 80 पैकी 73 जागा जिंकल्या, तर विधानसभा निवडणुकीतही विरोधकांचा धुव्वा उडवला. काँग्रेसला नगण्य जागा मिळाल्या. राज्यातील अशा राजकीय वातावरणात चौथ्या क्रमांकावरील काँग्रेस पक्षाचे पुनरुज्जीवन करण्याची अवघड व अशक्‍यप्राय जबाबदारी प्रियांका गांधी यांच्या खांद्यावर येऊन पडली. 

प्रियांका गांधी यांना राजकारणात आणावे, ही काँग्रेस कार्यकर्त्यांची जुनीच मागणी होती. "देशकी आँधी, प्रियांका गांधी', "अमेठीका डंका बेटी प्रियंका,' या घोषणा त्यावेळी देण्यात येत होत्या. त्यांनी प्रारंभी लखनौमध्ये त्यांचे बंधू काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांच्यासोबत रोड शो केला. त्यानंतर, त्यांनी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या फुलपूर मतदारसंघापासून नौकेतून उत्तरप्रदेशातील प्रचार दौऱ्याला प्रारंभ केला. सहा लोकसभा मतदारसंघातील गंगा किनारी राहणाऱ्या मतदारांशी संवाद साधत दोन दिवसांनी त्या वाराणसीत पोहोचल्या. गंगा पूजन केले. काशी विश्‍वनाथाचे दर्शन घेतले. तेथे मतदारांशी संवाद साधला. 

गांधी या त्यांच्या छोट्याच्या भाषणांत सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडतात. वाराणसीत त्या म्हणाल्या, "मोदी सर्वत्र फिरतात. पण वाराणसीतील गरीबांच्या घरी कधी त्यांनी भेट दिली का? तुमच्याशी संपर्क साधला का?,'' मोदी यांच्याप्रमाणेच त्याही सर्वसामान्य श्रोत्यांना त्यांच्या भाषणाशी जोडून घेतात. गेल्या महिन्याभराच्या प्रचारात त्यांनी वाराणसीतील भेटीगाठीचा, तेथील मतदारांशी बोलल्याचा उल्लेख वारंवार करीत आहेत. "सच्ची बात प्रियांकाके साथ,' ही घोषणा आता काँग्रेस कार्यकर्ते देत आहेत. मोदी यांच्या सरकारविरुद्ध थेट हल्ला करताना काँग्रेस गरीबांच्या सोबत असल्याचे त्या आवर्जून सांगत आहेत. 

पंतप्रधानांविरुद्ध निवडणूक लढविल्यास पराभव निश्‍चित आहे. राजकीय प्रवासाच्या प्रारंभीच अशा पराभवाला सामोरे जायचे का, या बाबत काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. सप-बसप आघाडीचा पाठिंबा घेण्यासाठी त्यांच्याशीही चर्चा करावी लागेल. वाराणसी येथून प्रियांका न लढल्यास, काँग्रेसकडून अलाहाबाद येथून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याबाबतही चर्चा सुरू आहे. तेथून काँग्रेसच्या पूर्वीच्या नेत्या आणि आता भाजपच्या राज्य मंत्रिमंडळातील मंत्री रिटा बहुगुणा भाजपच्या उमेदवार आहे. अलाहाबाद हाही प्रतिष्ठेचा मतदारसंघ असून, तेथील निवडणूकही अटीतटीची होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com