Loksabha 2019 : देशातील गरिबीला काँग्रेस जबाबदार : गडकरी

पीटीआय
Friday, 3 May 2019

भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने बुद्ध सर्किट मार्गासाठी दहा हजार कोटी रुपयांचा निधी उभारला आहे, तरी काँग्रेस भाजपला "बुद्धविरोधी' संबोधित आहे. 

- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री 

बेतुल (मध्य प्रदेश) : "देशातील गरिबीला कॉंग्रेस जबाबदार आहे. कृषी क्षेत्र आणि गावांच्या विकासासाठी पूर्वी कोणतेही ठोस धोरण आखले नाही,'' असा दावा केंद्रीय रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केला. 

बेतुल लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार दुर्गादास ऊईके यांच्यासाठी गडकरी यांची प्रचारसभा मुलताई येथे झाली. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही गरिबी हटविणे शक्‍य झाले नाही असा दावा करीत, मग सध्याचे कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना गरिबी नष्ट करणे कसे शक्‍य होणार आहे, असा प्रश्‍न त्यांनी केला.

"कॉंग्रेसमुळेच आपल्या देशात दारिद्य्र आहे. आपला देश संपन्न आहे; पण देशातील लोक गरीब आहेत. याचे कारण म्हणजे शेती आणि गावांच्या विकासासाठी कोणतीही योजना गंभीरपणे राबविली नाही. यामुळेच गहू स्वस्तात उपलब्ध होतो, तर बिस्कीट महाग असते. फळे स्वस्त असतात; पण त्यांचा रस महाग मिळतो,'' अशी टीका गडकरी यांनी केली. 

ते म्हणाले, की कॉंग्रेसच्या राजवटीत गरीब हा अधिक गरीब बनला. त्याच वेळी पक्षाच्या खुशमस्कऱ्यांनी स्वतःची गरिबीतून सुटका करून घेतली. जातीयवाद, धर्मवाद आणि दहशतीच्या राजकारणाचा वापर कॉंग्रेसने केला. मात्र भाजपला हे सर्व संपवायचे आहे. बेतुलमधून कॉंग्रेसकडून रामू टीकम हे रिंगणात उतरले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress responsible for Poverty of Country says Nitin Gadkari