Loksabha 2019 : देशाला मजबूर नाहीतर मजबूत सरकारची गरज : शिंदे

Loksabha 2019 : देशाला मजबूर नाहीतर मजबूत सरकारची गरज : शिंदे

वाडा : भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी वाडा येथे आयोजित केलेल्या महामेळाव्यात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी सांगितले, की देशाला मजबूर नाहीतर मजबूत सरकारची गरज आहे. 

महायुतीच्या वाडा येथे झालेल्या पहिल्याच मेळाव्याला अल्प प्रतिसाद मिळाल्याने व्यासपीठावर उपस्थित नेत्यांच्या चेहऱ्यावर नाराजीचा सूर दिसत होता. भाजप, शिवसेना, रिपाइं ,श्रमजिवी संघटना व कुणबी सेना भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी वाडा येथे महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या महामेळाव्याची वेळ प्रत्यक्ष सकाळी अकरा वाजता असताना दुपारी चार वाजता सुरू झाला. त्यामुळे या मेळाव्याला कार्यकर्त्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला.

एकनाथ शिंदे यांनी भाजप शिवसेना ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढवत आहे तर विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नसल्याने त्यांची स्थिती गोंधळल्यासारखी झाली आहे. वाडा एमएमआरडीए क्षेत्रात येत नसल्याने विकास खुंटला आहे. यापुढे वाडा क्षेत्र एमएमआरडीए क्षेत्रात आणण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. 

खासदार कपिल पाटील यांनी सांगितले, की वाडाचा विकास करण्याचा वादा केला. मोदी सरकारच्या पाच वर्षाच्या चांगल्या कामांमुळे या निवडणुकीत भ्रष्टाचार व महागाईचा मुद्दा नाही. महायुतीच्या घटक पक्षामध्ये आता कुणबी सेनाही सहभागी झाल्याने महायुतीचे पारडे अधिक जड झाले आहे. प्रत्येक कार्यकर्ते हा उमेदवार असून मी खासदार झाल्यानंतर प्रत्येक कार्यकर्ता खासदार असेल. या भावनेने काम करेल असे कपिल पाटील यांनी सांगितले. 

राम नवमीच्या दिवशीच चिकन बिर्याणी

वाडा येथे महायुतीच्या मेळावा शनिवारी रामनवमी या दिवशी आयोजित केला होता .या महामेळाव्यात उपस्थित सर्व कार्यकर्त्यासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. भोजनासाठी चिकन बिर्याणीची व्यवस्था केली होती. त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये रामाच्या नावाने मते मागणारे रामनवमीच्या दिवशी चिकन बिर्याणीवर ताव मारत होते, अशी प्रामाणिक कार्यकर्ते खंत व्यक्त करीत होते. 

नगरसेवकांचा बहिष्कार 

या मेळाव्याला वाडा नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षासह सर्व नगरसेवकांनी बहिष्कार टाकला होता. 

अल्प प्रतिसाद

मेळाव्यामध्ये निम्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या असल्याने मेळाव्याला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसत होते. या मेळाव्यात गर्दी दिसावी म्हणून अल्पवयीन मुलांना सहभागी केले होते. 

धनुष्यबाण चिन्ह दाबा

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाचा शेवट करताना कपिल पाटील यांच्या धनुष्यबाण या निशाणीवर मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी धनुष्यबान, धनुष्यबान असा तीन वेळा निशाणीचा नामोउल्लेख केल्यानंतर उमेदवार कपिल पाटील यांनी कमळ निशाणी असल्याचे निदर्शनास आणल्यानंतर शिंदे यांची चूक लक्षात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com