Loksabha 2019 : राज ठाकरेंच्या सभांना कर्नाटकातूनही मागणी

शनिवार, 20 एप्रिल 2019

नियोजित वेळापत्रकामुळे मनसे जाणार नाही कर्नाटकात?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभांचे वेळापत्रक यापूर्वीच ठरले आहे. त्यातच 29 तारखेला कर्नाटकात आणि त्याच दिवशी मुंबईतही मतदान आहे. त्यामुळे मनसेकडून कोणतेही प्रत्युत्तर देण्यात आले नाही, अशी माहिती मिळत आहे.

बंगळुरु : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची राज्यभरात जाहीरसभा होत आहे. त्यांच्या या सभेला राज्यातील भाजपविरोधी पक्षांकडून मागणी वाढत आहे. असे असताना आता राज ठाकरे यांच्या सभेला कर्नाटकातूनही मागणी आहे. 

कर्नाटक विधानसभेचे प्रतोद आमदार गणेश हुक्केरी यांचे वडील लोकसभा निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या या सभेसाठी निपाणी येथे सभा व्हावी, यासाठी गणेश हुक्केरी यांनी त्यांना पत्र लिहिले आहे. विशेष म्हणजे त्यांनी लिहिलेले हे पत्र मराठीमध्ये आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पाच वर्षांतील कामांचा आढावा राज ठाकरे यांच्याकडून व्हिडिओच्या माध्यमातून मांडला जात आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी मोदींनी दिलेली आश्वासनं आणि त्यानंतर घेतलेल्या सभा, मुलाखतींच्या आधारे राज ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळेच त्यांच्या या सभा चांगल्याच चर्चेत आहे.

तसेच राज ठाकरे यांच्या सभेला उत्तर प्रदेशातूनही मागणी असल्याची माहिती यापूर्वीच मिळाली आहे. त्यानंतर आता कर्नाटकातही हुक्केरी यांच्या प्रचारार्थ सभा व्हावी, अशी मागणी करणारे पत्र देण्यात आले आहे. 

दरम्यान, मनसेला याबाबतचे पत्र मिळाले असून, त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.  

नियोजित वेळापत्रकामुळे मनसे जाणार नाही कर्नाटकात?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभांचे वेळापत्रक यापूर्वीच ठरले आहे. त्यातच 29 तारखेला कर्नाटकात आणि त्याच दिवशी मुंबईतही मतदान आहे. त्यामुळे मनसेकडून कोणतेही प्रत्युत्तर देण्यात आले नाही, अशी माहिती मिळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for Speech of MNS Chief Raj Thackeray in Karnataka