Loksabha 2019 : नोटाबंदी 1947 नंतरचा सर्वांत मोठा गैरव्यवहार : राज ठाकरे

मंगळवार, 23 एप्रिल 2019

नोटाबंदी हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वांत मोठा गैरव्यवहार असून, याचीही चौकशी होणार हे निश्चित आहे.

मुंबई : पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या नावाने हे मते मागत आहेत आणि हल्ल्यानंतर काही दिवस त्यांचे विविध कपड्यांतील व हासत असतानाचे फोटो प्रसिद्ध झाले. नवनवीन कपडे घालून फिरणारे मोदी फकीर कसे काय? हे तर बेफिकीर आहेत, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. तसेच नोटाबंदी हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वांत मोठा गैरव्यवहार असून, याचीही चौकशी होणार हे निश्चित आहे, असेही ते म्हणाले.

मुंबईत राज ठाकरे यांची यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पहिलीच सभा झाली. या सभेला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर राज यांनी आतापर्यंत टीकास्त्र सोडले आहे. आताही त्यांनी या दोघांनाच लक्ष्य केले.

राज म्हणाले, की पुलवामा हल्ल्यानंतरही मोदी जगभर हसऱ्या चेहऱ्याने फिरत होते. आधी सूचना दिली असताना जवानांचा ताफा त्या रस्त्याने कसा गेला. आपली गुप्तचर यंत्रणांचे अपयश यातून दिसून येते. अटलबिहारी वाजपेयींनीही कधी जवानांच्या शौर्याचा असा फायदा उठविला नव्हता. मोदी आणि शहा लक्षात ठेवा, तुम्हीही विरोधी पक्षात जाणार आहात. नोटबंदी हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वांत मोठा घोटाळा आहे. याचीही चौकशी होणार हे निश्चित. भाजप-शिवसेनेला मत देणे म्हणजे या दोघांना मत देणे आहे. काळाजावर दगड ठेवा, ही दोन माणसे राजकारणाच्या क्षितीजावर दिसले नाही पाहिजेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demonetization is Big Scam in India says Raj Thackeray