Loksabha 2019 : महाआघाडीच्या वादळात उडणार कमळाच्या पाकळ्या : धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

- पंतप्रधान मोदींनी जनतेची घोर फसवणूक केली

- यंदा महाआघाडीचे वादळ

कुर्डुवाडी : "अच्छे दिन' येण्याचे आश्‍वासन देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपने जनतेची घोर फसवणूक केली आहे. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस महाआघाडीचे वादळ आले आहे. या वादळात भाजपच्या कमळाच्या पाकळ्या उडून जातील, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आज हल्लाबोल केला.

येथील आझाद मैदानावर आयोजित माढा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. मुंडे म्हणाले, शेतकऱ्यांची कर्जमाफी, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण यामध्ये भाजपने समाजाची फक्त फसवणूकच केली आहे. प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार निर्मिती करू, असे भाजप सरकारने आश्‍वासन दिले होते. परंतु याबाबतही तरुणाईची फसवणूक केली आहे. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होईल, असे भाजपवाले म्हणाले. परंतु 15 पैसेदेखील मिळाले नाहीत. प्रत्येक गावागावात सर्वसामान्यांतून "अच्छे दिन'ची चेष्टा होऊ लागली आहे. 

पंतप्रधानांनी शरद पवार यांच्यावर कौटुंबिक टीका करायला नको होती. यातून मोदींची पराभवाची मानसिकता दिसत आहे, असे मुंडे म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhananjay Munde Criticizes on BJP Party about Various Issue