Loksabha 2019 : साध्वींची भाजपमधून हकालपट्टी करा : नितीशकुमार

वृत्तसंस्था
रविवार, 19 मे 2019

- बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली ही मागणी.

पाटणा : नथुराम गोडसे देशभक्त होते, असे वक्तव्य करणाऱ्या भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची भाजपमधून हकालपट्टी करा, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली. तसेच या वक्तव्याबाबत भाजपने कोणतीही तडजोड करू नये, असेही नितीशकुमार म्हणाले. 

माध्यमांशी संवाद साधतना नितीशकुमार यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, प्रज्ञासिंह ठाकूर यांचे वक्तव्य निंदनीय आहे. या वक्तव्यावरून भाजपने त्यांच्यावर कोणती कारवाई केली हे पाहणे गरजेचे आहे. हा देश महात्मा गांधींचा असून, गुन्हेगारी, भ्रष्टाचार याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. 

दरम्यान, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वक्तव्याबाबत विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. 

काय केले होते प्रज्ञासिंह यांनी वक्तव्य ?

नथुराम गोडसे हे देशभक्त होते आणि ते देशभक्त राहतील. जे त्यांना दहशतवादी म्हणत आहेत, त्यांनी एकदा स्वत:कडे पाहावे. या निवडणुकीत अशा लोकांना योग्य उत्तर मिळेल. 

प्रज्ञासिहांना कारणे दाखवा नोटीस

प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याबाबत त्यांना भाजपकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dismiss Pragya Singh Thakur from BJP Party says Nitishkumar