Loksabha 2019 : भाजपसाठी 272 जागाही अवघडच!

Loksabha 2019 : भाजपसाठी 272 जागाही अवघडच!

भाजपच्या किमान 50 ते 60 जागा कमी होत असल्यामुळे, त्यांना या निवडणुकीत बहुमत मिळणार नाही. त्यांच्या मित्रपक्षांकडूनही या जागा भरून निघण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सध्या बहुमताचा 272 आकडा गाठण्यासाठी निकराची लढाई लढत आहे. 

लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत केंद्रातील युपीए सरकारविरुद्ध लोकांमध्ये नाराजी होती. त्या काळातील कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर विरोधक तुटून पडले होते. अण्णा हजारे यांचे दिल्लीतील आंदोलन, अरविंद केजरीवाल यांचा त्याला पाठिंबा यामुळे राजकीय वातावरण तापले. त्या काळात भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार ठरविले. गुजरातमध्ये सलग तीनवेळा मुख्यमंत्री असलेल्या मोदी यांनी गुजरात मॉडेलच्या धर्तीवर विकास करण्याचे आश्‍वासन देत देशभर दौरे केले. त्यांना तोंड देण्यासाठी सत्तारूढ काँग्रेसकडून कोणीही नव्हते. त्यामुळे देशभर काँग्रेसविरोधी लाट पसरली. त्यालाच काहीजण मोदी लाट म्हणतात. त्यामध्ये काँग्रेसचा धुव्वा उडाला. त्यांची संख्या 206 वरून 44 पर्यंत घसरली. तर भाजपची संख्या 116 वरून 282 वर पोहोचली. भाजपला 166 जागा जादा मिळाल्या. 1984 नंतर देशात पहिल्यांदाच एका पक्षाला बहुमत मिळाले. 

मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अनेक विकास कामे केली. मात्र, लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. त्याला कोणीच पुरे पडू शकणार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्‍न तीव्र बनले. त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे 2014 ची राजकीय स्थिती सध्या नाही. दरम्यानच्या काळात काही पोटनिवडणुकांमध्ये भाजप पराभूत झाली. सध्या लोकसभेच्या 543 जागांपैकी 22 जागा रिक्त असून, निवडणुकीला सामोरे जाताना भाजपकडे 268 जागा आहेत. 

काँग्रेस सावरली

भाजप मूळचा हिंदी बेल्टमधील पक्ष असून तेथे गेल्या निवडणुकीत भाजपच्या लोकप्रियतेची त्सुनामी आली आणि काँग्रेसची अक्षरशः वाताहात झाली. त्यानंतर काँग्रेस सावरली. पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेस जिंकली. कर्नाटकात मित्रपक्षासह सत्ता मिळविली. गुजरात, गोवा येथे चांगली लढत दिली. काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी सरकारविरोधातील हल्ले तीव्र केले आहेत. राफेल विमान खरेदी प्रकरणावरून त्यांनी मोदी यांच्यावर प्रश्‍नांचा भडीमार केला आहे. शेतकऱ्यांसाठी, बेरोजगारांसाठी, गरीबांसाठी योजना राबविण्याचे आश्‍वासन ते प्रचारात देत आहेत. त्यांच्या जोडीला प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशाची धुरा सांभाळली आहे. 

प्रादेशिक पक्षांचा विरोध

उत्तरप्रदेशात सप-बसपचे महागठबंधन, पश्‍चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस, ओरिसात मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा बिजू जनता दल हे प्रादेशिक पक्ष भाजपच्या विरोधात उभे आहेत. आंध्र प्रदेशातील बहुतेक जागा तेलगू देशम व वाएसआर काँग्रेस पक्ष यांच्यात वाटल्या जाणार आहेत. तेलंगणा विधानसभा नुकतीच जिंकलेल्या तेलंगणा राष्ट्र समितीचे तेथे वर्चस्व आहे. तमिळनाडूत द्रमुक व अण्णा द्रमुक यांच्यातच मुख्य लढत होईल. कर्नाटकात भाजपच्या 28 पैकी 17 जागा असल्याने, तेथे आणखी आशा नाही. त्यामुळे दक्षिण भारतात भाजपच्या जागा वाढणार नाहीत. 

उत्तर भारतात फटका

भाजपची मुख्य भिस्त राहणार आहे ती उत्तर भारतावर. विशेषतः उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन मोठ्या राज्यात गेल्या वेळी भाजपने मित्रपक्षांसह 118 पैकी 105 जागा जिंकल्या होत्या. उत्तरप्रदेशात ओबीसी फॅक्‍टरचा भाजपला फायदा झाला, तसेच अखिलेश यादव यांच्या सरकारबाबतची लोकांत नाराजी होती. यावेळी सप-बसपचे महागठबंधन झाले आहे. त्यांच्यासोबत अजितसिंह यांचा राष्ट्रीय लोकदल (आरएलडी) आहे. या आघाडीने भाजपपुढे तगडे आव्हान उभारले. त्यांनी गेल्या वर्षभरात लोकसभेच्या तीन पोटनिवडणुका जिंकल्या.

काँग्रेसच्या वतीने प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशात प्रचाराची धुरा सांभाळली. भरीस भर म्हणून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री व सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी भाजपने जागा दिल्या नाहीत, म्हणून 39 मतदारसंघांत निवडणूक लढविण्याची घोषणा काल केली. 

''उत्तर प्रदेशात 15 ते 20 जागांचे, जास्तीत जास्त 25 जागांचे नुकसान होईल. ही हानी पश्‍चिम बंगाल, ओरिसा, दक्षिण व पूर्व भारतात भरून निघेल,'' असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतेच मुलाखतीत सांगितले. त्यापेक्षाही जास्त जागा जातील, असे विरोधकांचे म्हणणे आहे. म्हणजेच उत्तरप्रदेशात भाजप 45 ते 50 च्या दरम्यान जागा मिळवेल. 

बिहारमध्ये गोंधळाची स्थिती

भाजपला पक्षांतर्गत विरोध शत्रुघ्न सिन्हा, किर्ती आझाद, यशवंत सिन्हा या बिहारी नेत्यांनी केला. बिहारमध्ये भाजपच्या पाच जागा अगोदरच कमी झाल्या. त्यांचे 22 खासदार आहेत. त्याऐवजी त्यांनी 17 जागांवर उमेदवार उभे केले. उर्वरीत जागा मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जनता दल (युनायटेड) यांना दिल्या.

भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे निवडणूक लढविणाऱ्या विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार याच्या मोदी विरोधी प्रचाराचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. तरीदेखील विरोधकांत एकी नसल्याचा फायदा एनडीएला मिळेल. यंदा विरोधक 10-12 जागांवर येतील, असा अंदाज आहे. बिहारलगतच्या झारखंडमध्ये गेल्यावेळी बारा जागा भाजपने जिंकल्या होत्या. यंदा तेथे विरोधकांची एकजूट झाली असून, भाजपला सात जागा मिळतील, असा अंदाज आहे. 

भाजपच्या गडाला खिंडार

राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड या राज्यांत भाजपने 91 पैकी 88 जागा मिळविल्या आहेत. तेथील तीन राज्यांत काँग्रेसने सत्ता मिळविली. या चार राज्यांत मिळून भाजपच्या किमान 25 ते 30 जागा घटणार आहेत.

पंजाबमध्येही काँग्रेसची सत्ता असून, तेथील भाजपची जागा अडचणीत आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती पुन्हा मैदानात उतरली असली, तरी भाजपच्या किमान तीन-चार जागा कमी होतील. कर्नाटक, तेलंगणा येथे भाजपच्या तीन जागा, दिल्लीत दोन जागा, जम्मू व काश्‍मीर, गोवा, उत्तराखंड येथे प्रत्येकी एक जागा भाजप गमावणार आहे. 

भाजप वाढणार

भाजपच्या जागा वाढण्याची शक्‍यता पश्‍चिम बंगाल आणि ओरिसा या राज्यांत आहे. डावी आघाडी कमी झाल्याने, पश्‍चिम बंगालमध्ये ती जागा भाजपने भरून काढली. तेथे गेल्या वेळी भाजपच्या दोन जागा होत्या. त्या जास्तीत जास्त आठ-दहा पर्यंत वाढतील. ओरीसातील 21 जागांपैकी गेल्या वेळी भाजपला एक जागा, तर बिजू जनता दलाला उर्वरीत वीस जागा मिळाल्या होत्या. ओरिसात भाजप आठ-दहा जागा मिळविण्याच्या तयारीने निवडणूक लढवित आहे. केरळमध्ये एखादी जागा, तर अन्य राज्यात एखाददुसरी जागा वाढू शकेल. 

भाजपचे कमीत कमी नुकसान होईल, असे गृहीत धरले तरी किमान पन्नास जागा गेल्या वेळेपेक्षा कमी होणार आहेत. म्हणजेच भाजप 220 ते 230 जागांमध्ये थांबेल. एनडीएतील भाजपच्या मित्र पक्षांचे गेल्यावेळी 54 खासदार होते. यंदा त्यांनी 40 ते 50 जागा जिंकल्या तरी 272 या बहुमताच्या आकड्यापर्यंत एनडीए पोहोचणार आहे. त्यामुळे या पुढील तीन आठवड्याचा प्रचार भाजपच्या दृष्टीने जिकीरीचा व महत्त्वाचा ठरणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com