व्हीव्हीपॅट मोजणीत बदल नाही; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

वृत्तसंस्था
बुधवार, 22 मे 2019

- व्हीव्हीपॅटमधील 50 टक्के चिठ्ठ्यांची ईव्हीएमसोबतच मोजणी करण्यात यावी, अशी होती विरोधकांची मागणी.

नवी दिल्ली : ईव्हीएममध्ये कोणताही फेरफार झाला नाही, याबाबतची खात्री व्हावी म्हणून व्हीव्हीपॅटमधील 50 टक्के चिठ्ठ्यांची ईव्हीएमसोबतच मोजणी करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. मात्र, ही मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांच्या मोजणीत कोणताही फेरबदल होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास बाकी असतानाच निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्याने विरोधाकांना मोठा झटका बसला आहे. व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठी आणि ईव्हीएममधील मते जुळतात की नाही हे पाहण्यात यावे, त्यासाठी व्हीव्हीपॅटमधील किमान 50 टक्के चिठ्ठ्यांची ईव्हीएमसोबत मोजणी करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.

दरम्यान, विरोधकांच्या या मागणीच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज मॅरेथॉन बैठक पार पडली. त्याला निवडणूक आयुक्त अशोक लवासाही उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Commission Rejects Oppositions Demands of VVPAT Counting