Loksabha 2019 : बारामतीच्या निवडणूकीबाबत कमालीची उत्सुकता

मिलिंद संगई
रविवार, 14 एप्रिल 2019

बारामती : यंदा कधी नव्हे ते बारामती लोकसभा मतदारसंघ देशाच्या नकाशावर महत्वपूर्ण लढतीतील म्हणून लक्षणीय ठरत आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपने आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना कमळ चिन्हावर रिंगणात उतरविले आहे. 

बारामती : यंदा कधी नव्हे ते बारामती लोकसभा मतदारसंघ देशाच्या नकाशावर महत्वपूर्ण लढतीतील म्हणून लक्षणीय ठरत आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपने आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना कमळ चिन्हावर रिंगणात उतरविले आहे. 

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील खरे विरोधक म्हणून पवार कुटुंबियांना लक्ष्य करत प्रत्येक सभातून त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे तर, दुसरीकडे अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांनी विविध मार्गांनी बारामती लोकसभा मतदारसंघ खेचून आणण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीची जबाबदारी स्विकारत यंदा भाजप या जागेबाबत खरोखरीच गंभीर आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रपक्षांनाही सोबत घेत परिवर्तनाची हाक भाजपने दिली आहे. 

दुसरीकडे सुप्रिया सुळे व अजित पवार यांनी नेहमीच्या निवडणूकांनुसारच प्रचाराची धुरा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्य़ांवर दिलेली आहे. बारामती, इंदापूर, पुरंदर या तीन तालुक्यात अजित पवार, हर्षवर्धन पाटील व संजय जगताप यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार वेगाने केला आहे. भाजपने खडकवासला, दौंड व भोर परिसरावर मताधिक्य मिळविण्याच्या दृष्टीने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. यंदा सुप्रिया सुळे पूर्वीपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होणार की कांचन कुल इतिहास घडविणार या कडे आता सर्वांचेच लक्ष आहे. 

प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरु झालेला असून पुढील रविवारी (ता. 21) प्रचार संपणार आहे. त्या मुळे आता सात दिवस प्रचारासाठी महत्वाचे ठरतील. भाजपने 19 एप्रिलला बारामती अमित शहा यांची सभा लावली आहे, जोडीला गिरीश महाजन, पंकजा मुंडे, महादेव जानकर, राम शिंदे यांच्या तोफा धडाडतील, जोडीला चंद्रकांत पाटील यांचा ठिय्या याच मतदारसंघात आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांची सभा होणार असून राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांच्या सभांबाबत अद्याप निश्चिती नाही. 

यंदा भाजपने पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक गांभीर्याने घेतली असून दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळीकडेच जोर व यंत्रणा लावलेली दिसून आली. निवडणूक जिंकण्यासाठी जे काही करणे गरजेचे आहे ते सर्व करताना ही यंत्रणा दिसत आहे. सुप्रिया सुळे व अजित पवार यांनी आपल्या तळागाळात पोहोचलेल्या यंत्रणेच्या मदतीने घरोघरी जाऊन प्रचार केला आहे. सुप्रिया सुळे याच उमेदवार असणार हे जवळपास निश्चितच होते त्या मुळे त्यांनी पाच वर्षात मतदारसंघ पिंजून काढला होता, त्याचा त्यांना निवडणूकीत निश्चित फायदा होणार आहे. दहा वर्षांचा लोकसभेचा व राजकारणाचा अनुभव पाठीशी असल्याने त्या अधिक आत्मविश्वासाने निवडणूकीला सामोरे जाताना दिसत आहेत. महादेव जानकर यांच्या निवडणूकीच्या वेळेसचे वातावरण व पार्श्वभूमी नसतानाही यंदा भाजपने सुळे यांच्याविरोधात कमालीचा जोर लावून बारामती लोकसभा मतदारसंघातील वातावरण तापविले आहे. कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करुन त्यांना निवडणूक जिंकायचीच असा संदेश वरिष्ठ पातळीपासूनच दिला जात असल्याने यंदा प्रथमच भाजपची यंत्रणा जोमाने काम करत असल्याचे चित्र आहे. 

दरम्यान ''यंदा वंचित बहुजन विकास आघाडीचे नवनाथ पडळकर हेही रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या कडून प्रस्थापितांच्या घराणेशाहीवर टीका होत असून यंदा नवीन उमेदवाराला मतदारांनी संधी द्यावी'', अशी मागणी होत आहे. 

राष्ट्रवादीचे या मतदारसंघावरील गेल्या काही वर्षांचे निर्विवाद वर्चस्व एकीकडे आणि दुसरीकडे मोदी शहांपासून फडणवीस चंद्रकांत पाटील यांनी लावलेला जोर दुसरीकडे, अशी स्थिती बारामतीत दिसते आहे. येत्या 23 तारखेला या लोकसभा मतदारसंघातील मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार या बाबत उत्सुकता आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extremely curious about Baramati elections