Loksabha 2019 : लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचे उद्या मतदान; महाराष्ट्रातील 17 जागा

वृत्तसंस्था
रविवार, 28 एप्रिल 2019

राज्ये आणि मतदारसंघांची संख्या 
- महाराष्ट्र : 17 
- राजस्थान : 13 
- उत्तर प्रदेश : 13 
- पश्‍चिम बंगाल : 08 
- मध्य प्रदेश : 06 
- ओडिशा : 06 
- बिहार : 05 
- झारखंड : 03 
- जम्मू-काश्‍मीर : 01 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (ता. 29) चौथ्या टप्प्याचे मतदान होईल. यासोबतच महाराष्ट्रातील निवडणुकीची रणधुमाळी शांत होणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील शिल्लक 17 जागांचा समावेश असून, नऊ राज्यांतील 72 जागांसाठी 961 उमेदवार मतदारांकडे कौल मागतील. त्यात मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या पुत्रांसोबतच कन्हैया कुमार, पार्थ पवार, ऊर्मिला मातोंडकर, डॉ. अमोल कोल्हे या नव्या, परंतु चर्चेतील चेहऱ्यांचाही समावेश आहे. 

मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र मुकुलनाथ छिंदवाडामध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. जबलपूरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष राकेशसिंह यांच्यापुढे कॉंग्रेसचे राज्यसभा खासदार विवेक तनखा यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. राजस्थानात जोधपूरमध्ये वैभव गेहलोत विरुद्ध मोदी सरकारमधील मंत्री गजेंद्र सिंह शेखावत ही लढत लक्षवेधी असेल. यासोबत पालीमध्ये विद्यमान मंत्री व भाजपचे पी. पी. चौधरी, बारमेरमध्ये भाजपचे दिग्गज नेते असलेल्या जसवंतसिंह यांचे पुत्र मानवेंद्रसिंह यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली आहे. झालावाडमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचे पुत्र दुष्यंत पुन्हा मतदारांचा कौल आजमावणार आहेत. 

उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये वादग्रस्त वक्तव्यांमुळे प्रसिद्ध असलेले भाजप खासदार साक्षी महाराज, फरुखाबादमध्ये कॉंग्रेसचे माजी मंत्री सलमान खुर्शीद, इटावामध्ये भाजपमधून कॉंग्रेसवासी झालेले अशोक दोहरे विरुद्ध भाजपचे माजी मंत्री डॉ. रमाशंकर कठेरिया, कन्नौजमध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल, कानपूरमध्ये कॉंग्रेसचे माजी मंत्री श्रीप्रकाश जायस्वाल हे रिंगणात आहेत.

आसनसोलमध्ये मोदी सरकारमधील मंत्री बाबूल सुप्रियो आणि तृणमूल कॉंग्रेसच्या अभिनेत्री खासदार मुनमून सेन, वीरभूममधून तृणमूल कॉंग्रेसच्या शताब्दी रॉय हे प्रमुख चेहरे मैदानात आहेत. बिहारमध्ये बेगुसरायमधून भाजपचे मंत्री गिरिराज सिंह विरुद्ध भाकपचे विद्यार्थी नेते कन्हैया कुमार, मोदी सरकारमधून बाहेर पडलेले राष्ट्रीय लोक समता पक्षाचे माजी मंत्री उपेंद्र कुशवाह लढत आहेत. 

राज्ये आणि मतदारसंघांची संख्या 
- महाराष्ट्र : 17 
- राजस्थान : 13 
- उत्तर प्रदेश : 13 
- पश्‍चिम बंगाल : 08 
- मध्य प्रदेश : 06 
- ओडिशा : 06 
- बिहार : 05 
- झारखंड : 03 
- जम्मू-काश्‍मीर : 01 

09 
राज्ये 

72 
मतदारसंघ 

943 
उमेदवार 

1.40 लाख 
मतदान केंद्रे 

12.79 कोटी 
मतदार 

राज्यातील लढती : 
नंदुरबार : के. सी. पाडवी (कॉंग्रेस) विरुद्ध खासदार हीना गावित (भाजप) 
धुळे : कुणाल रोहिदास पाटील (कॉंग्रेस) विरुद्ध डॉ. सुभाष भामरे (भाजप) 
दिंडोरी : धनराज महाले (राष्ट्रवादी) विरुद्ध भारती पवार (भाजप) 
नाशिक : समीर भुजबळ (राष्ट्रवादी) विरुद्ध हेमंत गोडसे (शिवसेना) 
पालघर : बळिराम जाधव (बहुजन विकास आघाडी) विरुद्ध राजेंद्र गावित (शिवसेना) 
भिवंडी : सुरेश टावरे (कॉंग्रेस) विरुद्ध कपिल पाटील (भाजप) 
कल्याण : श्रीकांत शिंदे (शिवसेना) विरुद्ध बाबाजी पाटील (राष्ट्रवादी) 
ठाणे : राजन विचारे (शिवसेना) विरुद्ध आनंद परांजपे (राष्ट्रवादी) 
उत्तर मुंबई : ऊर्मिला मातोंडकर (कॉंग्रेस) विरुद्ध गोपाळ शेट्टी (भाजप) 
उत्तर मध्य मुंबई : प्रिया दत्त (कॉंग्रेस) विरुद्ध पूनम महाजन (भाजप) 
वायव्य मुंबई : संजय निरूपम (कॉंग्रेस) विरुद्ध गजानन कीर्तिकर (शिवसेना) 
ईशान्य मुंबई : संजय दिना पाटील (राष्ट्रवादी) विरुद्ध मनोज कोटक (भाजप) 
दक्षिण मध्य मुंबई : एकनाथ गायकवाड (कॉंग्रेस) विरुद्ध खासदार राहुल शेवाळे (शिवसेना) 
दक्षिण मुंबई : मिलिंद देवरा (कॉंग्रेस) विरुद्ध अरविंद सावंत (शिवसेना) 
मावळ : पार्थ पवार (राष्ट्रवादी) विरुद्ध श्रीरंग बारणे (शिवसेना) 
शिरूर : डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी) विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना) 
शिर्डी : भाऊसाहेब कांबळे (कॉंग्रेस) विरुद्ध सदाशिव लोखंडे (शिवसेना)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fourth phase loksabha election 2019 on monday