Loksabha 2019 : नरेंद्र मोदींच्या मजबूत हातात देश द्या : उद्धव ठाकरे

श्रीधर ढगे
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

काँग्रेस-राष्ट्रवादी एकही जागा जिंकणार नाही

खामगाव : आधी देशात दहशतवादी हल्ले झाले, की काँग्रेस सरकार फक्त पाकिस्तानला खलिते पाठवत होती. आता केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना आणि मित्र पक्षांचे सरकारने दोनवेळा सर्जिकल स्ट्राईक आणि एकदा हवाई हल्ला करून दहशतवाद्यांचा खात्मा केला. आता फक्त सर्जिकल स्ट्राईक नाही तर पाकिस्तानचे कंबरडे मोडायचे असून, त्यासाठी देश नरेंद्र मोदी यांच्या मजबूत हातात द्या, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

खामगाव येथील जे व्ही मेहता नवयुग विद्यालयाच्या भव्य मैदानावर शिवसेना भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी आयोजित जाहीरसभेत उद्धव ठाकरे बोलत होते. आपल्या भाषणाची सुरवात करताना उद्धव ठाकरे म्हणाले, की ही गर्दी, हा जल्लोष बघितल्यानंतर काय बोलावे, ते समजत नाहीत. हे भगवं वादळ आहे. ५६ पक्षं एकत्रं आले तरी कुणी रोखू शकत नाही. जमिन तापलीय, सूर्य आग ओकतोय पण तुमची डोकी उन्हाने नाही तर भगव्या विचाराने गरम झाली पाहिजेत, असे सांगून देशद्रोह्यांना फासावर लटकवणारं सरकार हवं असेल तर महायुतीला मतदान करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

तसेच आजपर्यंत जेव्हा दहशतवादी हल्ले झाले तेव्हा काहीही झाले नाही. पण आता दोन वेळा पाकिस्तानवर हल्ले झाले, एकदा हवाई हल्ला केला. मात्र, आता मी मोदी यांना सांगेन सर्जिकल स्ट्राईक नको तर एकदा पाकिस्ताचे कंबरडे मोडा.

आम्ही सैन्यावर राजकारण करत नाही

विरोधी पक्षाचे नेते आम्हाला म्हणतात सैन्यावर राजकारण करू नको. आम्ही मुळीच राजकारण करत नाही. मात्र ते किती दहशतवादी मारले याचे पुरावे मागतात. एकीकडे पुरावे मागतात आणि दुसरीकडे शरद पवार बोलतात, की सर्जिकल स्ट्राईक करण्याचा सल्ला मीच दिला होता, मग हल्ला झाला की नाही झाला हे त्यांनीच सांगावे, असे म्हणत ज्यांनी सैन्य दलाचा भूखंड विक्री काढला होता, ते  शरद पवार पंतप्रधान झाले तर देश विकायला काढतील असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.

खुर्चीसाठी लाचार होऊन शरद पवार सोनियांच्या दारी गेले असा टोला लगावून सरकार वर टीका करता मग सत्तेतून बाहेर का नाही पडत हे सतत शरद पवार विचारायचे कारण आम्ही बाहेर पडल्यावर यांना युती करायची होती असे उद्धव म्हणाले.

राहुल गांधींसारख्या नेभळटाच्या हातात देश द्यायचा का?

आम्ही बोलतो राम मंदिर बांधू, राहुल गांधींच्या जाहीरनाम्यात राम मंदिर कुठेच नाही, आम्ही ३७० कलम काढणार असं बोलतो, राहुल गांधी बोलतात की 370 कलम काढणार नाही. कन्हैया, दाऊद सारख्यांना वाचविण्यासाठी राहुल गांधीना देशद्रोह्याचा कायदा काढून टाकायचाय आहे. मात्र, ही इटली नाही हा हिंदुस्थान आहे इथे देशद्रोह्याला जागा नाही, असे म्हणत राहुल गांधींसारख्या नेभळटाच्या हातात देश द्यायचा का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

काँग्रेस-राष्ट्रवादी एकही जागा जिंकणार नाही : जाधव

काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी एकही जागा जिंकणार नाही. सर्व जागा महायुती जिंकणार असे सांगत खासदार प्रतापराव जाधव यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मंचावर ना.संजय राठोड, गुलाबराव पाटील, महादेव जानकर, विनायक मेटे, रणजित पाटील, आमदार डॉ. संजय कुटे, ऍड आकाश फुंडकर, संजय रायमूलकर, शशिकांत खेडेकर,चैनसुख संचेती, गोपिकीशन बाजोरिया, आमदार बाजोरिया, मिलिंद नार्वेकर, खासदार विकास महात्मे, शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, शिवसेना जिल्हाध्यक्ष जालिंदर बुधवन्त , शांताराम दाणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे,शिवसंग्रामकंगवे संदीप पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उमा ताई तायडे, संजय गायकवाड यांच्यासह भाजप शिवसेनेचे जिल्ह्यातील नगराध्यक्ष,  पदाधिकारी उपस्थित होते. संचलन व आभार प्रदर्शन ऍड रमेश भट्टड यांनी केले. खामगावची सभा आटोपून उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने औरंगाबाद व तेथून विमानाने मुंबईला रवाना झाले.

मातृतीर्थ मर्दांचा जिल्हा

पुलवामा हल्ल्यात बुलंद बुलडाणा जिल्ह्यातील दोन जवान हुतात्मा झाले. बुलडाणा जिल्हा जिजाऊंचा पावन मातृतिर्थ जिल्हा आहे. ज्या मातेने आमच्या दैवताला जन्म दिला. या जिल्ह्यात मर्द पैदा होतात, मातृतीर्थ बुलडाणा जिल्हयात नामर्द पैदा होवू शकत नाहीत असे उद्धव ठाकरे यांनी म्हणताच टाळ्यांचा प्रंचड कडकडात झाला.

मंचावर हाऊसफुल्ल उपस्थिती

उद्धव ठाकरे यांच्यापूर्वी मंचावरून अनेक नेत्यांनी आपले विचार मांडले. नामदार गुलाबराव पाटील, रणजित पाटील, विनायकराव मेटे, आमदार संजय कुटे, आमदार ऍड आकाश फुंडकर यांच्यासह मान्यवर नेत्यांनी आघाडीवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

उद्धव ठाकरेंच्या सभेची हॅट्ट्रिक

बुलढाणा येथील जे व्ही मेहता नवयुग विद्यालयाच्या भव्य प्रगणावर उद्धव ठाकरे यांच्या विराट सभेची हॅट्ट्रिक झाली. 2009 , 2014 आणि आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराकरिता उद्धव ठाकरे खामगाव येथे आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give Power in The Hands of Narendra Modi says Uddhav Thackeray