Loksabha 2019 : 'मोदींच्या सत्ताकाळात वाढले दहशतवादी हल्ले'

वृत्तसंस्था
शनिवार, 4 मे 2019

- मोदींच्या सत्ताकाळात दहशतवादी हल्ल्यांमध्ये झाली 176 टक्‍क्‍यांनी वाढ.

नवी दिल्ली : देशात मोठे दहशतवादी हल्ले झाले नसल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारावर प्रश्‍न उपस्थित करताना कॉंग्रेसने मोदींच्या सत्ताकाळात दशतवादी हल्ल्यांमध्ये 176 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचा आरोप केला. पुलवामा, पठाणकोटसारखे झालेले 16 हल्ले "मोठे हल्ले' नाहीत काय, असाही चिमटा कॉंग्रेसने काढला आहे. 

कॉंग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी पक्ष मुख्यालयातील दैनंदिन वार्तालापात मोदींवर हल्ला चढवला. जनतेची विवेकबुद्धीच मोदी नाकारत आहेत. बेरोजगारी, 15 लाख, कृषीचे प्रश्‍न यांसारख्या मूलभूत प्रश्‍नांवर न बोलता मोदी दहशतवाद आणि अंतर्गत सुरक्षेवरच का बोलत आहेत, असा प्रश्‍न शर्मा यांनी विचारला. आपल्या सत्ताकाळात मोठे दहशतवादी हल्ले झालेच नाहीत, हा मोदींचा दावाही खोटा असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. उलट भाजप सरकारच्या काळात अशा हल्ल्यांमध्ये 176 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. अलीकडेच झालेल्या पुलवामातील दहशतवादी हल्ल्यासोबतच उरी, उधमपूर, पाम्पोर, पठाणकोट, गुरुदासपूरमधील दहशतवादी हल्ल्यांनी देश हादरला.

2014 ते 2018 या कालावधीत 1700 हून अधिक लहान-मोठे हिंसक हल्ले झाले आहेत. यामध्ये 426 जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले, तर 1400 नागरिकांचा बळी गेला. परंतु, मोदी नेहमी वस्तुस्थिती नाकारतात. देशाची केवळ अंतर्गत नव्हेत बाह्यसुरक्षाही या सरकारच्या काळात दुबळी झाली, असे शरसंधान शर्मा यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increased Terror Attack In Modi Government