esakal | कारणराजकारण : सुळे असोत की कुल; प्रश्नांचे काय?
sakal

बोलून बातमी शोधा

baramati_kule_sule

बारामती विधानसभा मतदारसंघ सोडला तर कमीअधिक प्रमाणात प्रत्येक मतदारसंघात प्रश्न आहेत. मग प्रश्न पडतो की, पुढे सुळे असोत की कुल; या प्रश्नांचे काय होणार हा प्रश्न उरतोच!

कारणराजकारण : सुळे असोत की कुल; प्रश्नांचे काय?

sakal_logo
By
अशोक गव्हाणे

बारामती लोकसभा मतदारसंघ हा तसे पाहिल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेला मतदारसंघ. या मतदारसंघात विरोधकांनी कायम आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. पण, ते पवारांनी मोडून काढले. साधारणतः 25 वर्षांपासून पवार कुटुंबापैकी 
कुणीतरी या मतदारसंघाचे प्रतिनधित्व करत आहे.

2014 च्या निवडणुकीत खा. सुप्रिया सुळेंसमोर रासपचे नेते महादेव जानकर यांनी मोठे आव्हान निर्माण केले होते. आता भाजपच्या तिकिटावर कांचन कुल यांनी आव्हान निर्माण केले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात भटकंती करताना, गावा-गावांमध्ये मतदारांशी संवाद साधताना मात्र एक चित्र समोर येते ते म्हणजे येणाऱ्या काळात इथले प्रतिनिधित्व सुळे यांच्याकडे असो की कुल यांच्याकडे इथे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे काय? 

दौंड, बारामती इंदापुरपासून ते पुरांदरपर्यंत लोकांच्या बोलण्यात घराणेशाहीचा मुद्दा आहे. मग ते सुळे यांच्याबाबत असो की कुल यांच्याबाबत असो. सुळे आणि कुल या दोन्ही उमेदवारांच्या मागे घराणेशाही आहे. घराणेशाहीच्या जोडीला शेती, भिमा-पाटस कारखान्याची अवस्था, गावांमधली रखडलेली विकासकामे असे कितीतरी मुद्दे कुल प्रतिनिधित्व करत असलेल्या दौंड विधानसभा मतदारसंघात दिसतात, म्हणूनच त्यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होते. गावं राजकीयदृष्ट्या पुढारलेली वाटत असली तरी त्यांना राजकारण्यांकडून आपले मुद्दे सोडवून घेण्यात अपयश आलेले दिसते. शेतीचं पाणी आणि कर्जमाफी हे खरे मुद्दे शेतकऱ्यांच्या बाबतीत आहेत. याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न व्हायला हवा. राहुल कुल यांच्या दौंड विधानसभा मतदारसंघातील कुरकुंभसारख्या एमआयडीसीत कामगारांचे आणि अन्य अगणित प्रश्न आहेत, यावर काय काम झाले हा प्रश्न पडतो. एमआयडीसीला जमीन देऊन कंत्राटी नोकरी करणारे शेतकरी आजही आहेत.

पुढे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या तालुक्यातील परिस्थिती तर अजून भयाण आहे. इथली दुष्काळाची दाहकता लक्षात घेण्यासारखी आहे. शेतीच्या पाण्याच्या प्रश्नावर कोणाकडेच ठोस उत्तर नाही हेच दुर्दैव. इंदापूर विधानसभा मतदारसंघात दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणावर जाणवतात. पिण्याच्या पाण्यासाठीही ओरड आहे. मागील काही दिवसांपूर्वी तिथल्या निरा नदीचे आंदोलन गाजले. पण नदीसोबत आणि आंदोलकांसोबत कुठलाही न्याय झाला नाही. नदीचं पात्र पाहून मन विचलित होते. नदीचं भकास पात्र तिचे विद्रुपिकरण दाखवते.

हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा गावातही या प्रश्नांनी थैमान घातलेले आहे. पुढे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या मतदारसंघात विमानतळाचा प्रश्न आ वासून उभा आहे. एकेकाचे डोकं फोडू पण, विमानतळ होऊ देणार नाही असं लोकांना सांगावं लागतंय. बारामती विधानसभा मतदारसंघ सोडला तर कमीअधिक प्रमाणात प्रत्येक मतदारसंघात प्रश्न आहेत. मग प्रश्न पडतो की, पुढे सुळे असोत की कुल; या प्रश्नांचे काय होणार हा प्रश्न उरतोच!

loading image