Loksabha 2019 : पाटणासाहिबमध्ये कायस्थ किंगमेकर; शत्रुघ्न सिन्हा, रविशंकर प्रसाद यांच्यात चुरस

उज्ज्वलकुमार
सोमवार, 15 एप्रिल 2019

- बिहारमधील पाटणासाहिब मतदारसंघामध्ये यंदा चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

पाटणा : बिहारमधील पाटणासाहिब मतदारसंघामध्ये यंदा चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. भाजपचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा हे येथून मैदानात उतरले असून 2009 आणि 2014 अशा सलग दोन निवडणुकांमध्ये घवघवीत यश संपादन केल्यानंतर सिन्हा हे आता तिसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत. सिन्हांची येथे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याशी लढत असेल, सिन्हा आणि रविशंकर प्रसाद यांचे तसे कौटुंबिक संबंध. दोघेही जातीने कायस्थ असल्याने येथे त्यांना या जातीचा मोठा पाठिंबा मिळू शकतो, अशी शक्‍यता राजकीय विश्‍लेषक वर्तविताना दिसतात. 

अगदी प्रारंभीपासून भाजप नेतृत्वावर टीका करणाऱ्या सिन्हा यांचे तिकीट याखेपेस कापले जाईल अशी शक्‍यता वर्तविली जात होती, झालेही तसेच. आता बिहारी बाबू कॉंग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मागील वेळेस सिन्हा यांनी भोजपुरी चित्रपटाचे नायक कुणालसिंह यांचा पराभव केला होता.

सिन्हा यांना 4 लाख 85 हजार 905 एवढी मते मिळाली होती. नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाने तेव्हा स्थानिक डॉक्‍टर गोपाल सिन्हा यांना मैदानात उतरविले होते. त्यांना केवळ 91 हजार एवढीच मते मिळाली होती. पाटणासाहिब मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो, यात चार शहरी आणि दोन ग्रामीण भाग आहेत. सध्या पाच विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून, एकावर राष्ट्रीय जनता दलाचा कब्जा आहे. 

"मंडल'नंतर भाजप 

पाटणासाहिब मतदारसंघामध्ये कायस्थांची तब्बल चार लाख मते आहेत. ही मते नेमकी कोणाच्या बाजूने जातात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सुरवातीपासूनच पाटण्यामध्ये कॉंग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव होता; पण मंडल आंदोलनानंतर या ठिकाणावर भाजपने हातपाय पसरायला सुरवात केली. विशेष म्हणजे शत्रुघ्न सिन्हा यांनी मागील दहा वर्षांच्या काळात एकही लक्षणीय काम केलेले नाही; पण भाजपच्या संघटनात्मक बळावर आपण विजयी होऊ अशी आशा सिन्हा यांना होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kayastha Kingmaker in Patanasahib Constituency