राज ठाकरेंची उंची आता लोकच मोजून दाखवत आहेत : सोमय्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

किरीट सोमय्या यांनी 'आता लोकंच राज ठाकरेंची उंची दाखवून देत आहेत,' अशा कडक शब्दांत राज ठाकरेंवर टीका केली.

भांडूप : 'अपघातात हात गमावलेल्या मुंबईच्या मोनिका मोरे हिला किरीट सोमय्या न्याय देऊ शकले नाही, तर त्यांनी केवळ प्लॅटफॉर्मची उंची मोजण्याच कामं केलं,' अशी टीका मनसे अध्यक्षव राज ठाकरे यांनी काल (ता. 24) भांडूप येथील सभेत केली. याला किरीट सोमय्या यांनी 'आता लोकंच राज ठाकरेंची उंची दाखवून देत आहेत,' अशा कडक शब्दांत उत्तर दिले.

'मोनिका मोरेला स्टेजवर घेऊन येणाऱ्या राज ठाकरेंनी तिची काय काळजी केली या भानगडीत मी पडणार नाही. पण मोनिका मोरे सारख्या अनेक जणांना आम्ही कित्येक लाख खर्च करून आधुनिक प्रकारचे हात, पाय बसवले आहेत. मोनिका मोरेमुळे आज अनेक अपघातग्रस्तांना हिंमत मिळत आहे. अनेक जण या हिंमतीमुळे स्वतःच्या पायावर उभे आहेत. तसेच आम्ही प्लॅटफॉर्मची उंचीदेखील वाढवली, पण राज ठाकरेंची उंची आता लोकंच मोजून दाखवत आहेत. राज यांची उंची 2009 मध्ये जी होती, ती आता जमिनीच्या खाली गेली आहे,' अशा झणझणीत शब्दांत सोमय्या यांनी राज यांच्या टीकेला उत्तर दिले.  

तर मोनिकाला सरकारी नोकरी का नाही मिळाली, असा प्रश्न विचारला असता, सोमय्या यांनी काहीही उत्तर न देता मौन बाळगले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kirit Somaiya and Raj Thackeray criticizes each other